आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्पविरुद्ध एल्गार : मायक्रोसॉफ्ट, अॅपल, ट्विटरसह 97 कंपन्यांनी ट्रम्पविरुद्ध ठोकला दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन /सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेत मुस्लिम देशांच्या नागरिकांवर प्रवेशबंदी घातल्याने वातावरण तापत आहे. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगलसह सिलिकॉन व्हॅलीतील ९७ बड्या कंपन्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाला कायदा विरोधी आणि घटनेचे उल्लंघन म्हटले आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी सॅनफ्रान्सिस्को न्यायालयाच्या निर्णयाला प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेवर मोठा हल्ला झाला तर आता न्यायाधीश महाशय जबाबदार असतील असे ट्रम्प म्हणाले. सिलिकॉन व्हॅलीच्या ९७ कंपन्यांनी सोमवारी नाइंथ सर्किट अपील कोर्टात खटले दाखल केले. या कोर्टाने ट्रम्प प्रशासनाचा निर्णय स्थगित केला असून त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येऊ शकत नाही, असे सांगितले.
 
कंपन्यांची भूमिका अशी
मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गुगल,ट्विटर, नेटफ्लिक्स, उबेर, लिव्हाई स्ट्रॉस आणि चोबानी या कंपन्या ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात गेल्या आहेत. स्थलांतरितांमुळे देशात अनेक शोध लागले आहेत. त्याचे श्रेय अमेरिकेच्या नावे आहे. हा आदेश ५० वर्षांपासून येथे स्थायिक स्थलांतरितांविरुद्ध आहे. निष्पक्ष आणि समतेच्या तत्त्वाला छेद देणारा हा निर्णय आहे. व्यापार, संशोधन आणि विकासाला खीळ बसवणारा हा निर्णय आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. 
 
कार्यपालिका विरुद्ध न्यायपालिका
शनिवारपासून ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ट्विटर युद्ध सुरू केले आहे. या ‘सो कॉल्ड जज’चा निर्णय हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी म्हटले आहे की, देशाच्या रक्षणार्थ सर्व कायदे राबवण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्धार आहे. बोस्टन न्यायालयाचा निकाल निर्णयाच्या बाजूने आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या निर्णयाला आम्ही कायदेशीररीत्या निष्प्रभ करू.
 
अमेरिकेत अघटित घडले तर न्यायाधीशच जबाबदार : ट्रम्प
वॉशिंग्टन  - सात मुस्लिम देशांच्या प्रवाशांवर बंदी घालणाऱ्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता ट्रम्प यांनी न्यायाधीशांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला. यापुढे काही अघटित घडले तर देशाने न्यायाधीशांना स्पष्टीकरण मागावे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सॅन फ्रान्सिस्कोचे जिल्हा न्यायाधीश जेम्स रॉबर्ट आता ट्रम्प यांच्या विखारी शब्दांचे लक्ष्य आहेत. मुस्लिम देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर ९० दिवसांची आणि सिरियन निर्वासितांवर १२० दिवसांच्या प्रवेशबंदीचे रीतसर आदेश ट्रम्प प्रशासनाने होते. त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश सॅन फ्रान्सिस्को न्यायालयाने दिले.  एका न्यायमूर्तीने देशाच्या संरक्षणावर गदा आणावी हे अनाकलनीय आहे, आता अमेरिकन जनतेने काही वाईट घडल्यास न्यायपालिकेकडून खुलासा घ्यावा, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. 
 
न्यायाधीश  ही व्यक्ती नव्हे, तर ती व्यवस्था 
ट्रम्प यांनी न्यायाधीशावर  केलेली टीका प्रशासनातील अनेकांना पटली नसल्याचे सांगण्यात आले. सिनेटचे नेते मीच मॅककॉनेल यांनी देखील न्यायपीठावरील  टीकेचा निषेध केला. न्यायाधीश ही व्यक्ती नसून व्यवस्था आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या ट्विट्सचा निषेध करत असल्याचे  म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...