आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय-मलेशियन तरुणी मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर - २० वर्षीय भारतवंशीय शीख तरुणी मिस युनिव्हर्स २०१६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मलेशियाचे प्रतिनिधित्व करत आहे. मनिला येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किरणमित कौर बलजितसिंग जास्सल असे या तरुणीचे नाव आहे. मिस युनिव्हर्स मलेशिया २०१६  किताब तिला मिळाला. 

शिवाय सर्वात सुंदर हास्याचा पुरस्कारही तिने पटकावला होता. फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे २० जानेवारी रोजी ६५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किरणचे कुटुंब अनेक वर्षांपासून मलेशियात स्थायिक आहे. सुबांग जाया या सेलांगुर राज्यातील शहरात  हे कुटुंब राहते.  ऐश्वर्या रॉयला १९९४ मध्ये मिस वर्ल्ड आणि त्याच वर्षी सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्स पुरस्काराने गौरवण्यात आले. या दोघी आमच्यासाठी प्रेरणास्रोत ठरल्या असे किरणमीत आणि रणमीत या जास्सल भगिनींनी सांगितले. 

मला केवळ सौंदर्य स्पर्धा जिंकायची नव्हती, असे किरणने सांगितले. मला मिस युनिव्हर्स मलेशिया हा किताब मिळाला याचा अत्यानंद आहे. मात्र ,सुश्मिता सेनने अनेक धर्मादाय कार्ये करून मानवतेची सेवा केली आहे. असे माझ्याकडून घडावे, असे वाटते. जीवनाला सार्थकता येईल, असे मत किरणने व्यक्त केले.  
 
सौंदर्य स्पर्धेचे व्यासपीठ प्रभावी
किरण इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दंतचिकित्सा शास्त्राची विद्यार्थिनी आहे. सौंदर्य स्पर्धेचे व्यासपीठ प्रभावी असून तरुणींना आपला आवाज आणि मते व्यक्त करण्याची संधी याद्वारे मिळते. यामुळे केवळ सौंदर्य मिरवण्याची संधी मिळते, असे आपल्याला वाटत नाही. चांगल्या कामांची संधी आणि समाजातील प्रत्येक स्तरावर काम करण्यासाठी प्रोत्साहनही येथूनच मिळते. लोक तुम्हाला आेळखू लागतात व सामाजिक कार्य करण्यासाठी यामुळे हातभार लागतो.  
 
किरणच्या कुटुंबात मॉडेलिंगचा वारसा
किरणची आई रणजित कौर या क्लासिक मिसेस मलेशिया २०१५ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. किरणची बहीण रणमित या यशस्वी मॉडेल आहेत. रणमित व्यवसायाने डॉक्टर आहेत. जास्सल भगिनी मलेशियामध्ये लोकप्रिय असून सौंदर्य स्पर्धांकडे त्यांची आेढ बालपणापासून होती. किरणची बहीण रणमित यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम भारतातील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समधून पूर्ण केला.