आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार सईदचा आम्हालाच धोका, PAK संरक्षणमंत्र्यांची जाहीर कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युनिच / इस्लामाबाद-  मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा पाकिस्तानी समाजासाठी गंभीर धोका असल्याची कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली. यासोबत पाकिस्तानने हाफिज व त्याच्या हस्तकांचे शस्त्रपरवाने रद्द केले. सईदला ३० जानेवारी रोजी नजरकैद केल्यानंतर त्याचे नाव पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या यादीत टाकले होते. पाकिस्तानच्या कट्टरपंथीय, राजकीय नेते व धर्मगुरूंनी संरक्षणमंत्र्यांवर कठोर शब्दात टीका करत ते भारताचे चमचे असल्याचे म्हटले आहे. परवेझ मुशर्रफ यांनी एक दिवस आधीच हाफिज सईदला देशभक्त संबोधले होते.
 
म्युनिच संरक्षण परिषदेत ख्वाजा आसिफ म्हणाले, दहशतवादाचा कोणताही धर्म असत नाही. अतिरेकी मुसलमान, बौद्ध किंवा हिंदू नसतो, तो केवळ अतिरेकी असतो. मात्र, अतिरेकी हल्ल्यात मरणारे ९० टक्के नागरिक मुसलमान असतात असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारमधील एखाद्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या हाफिज सईदला अतिरेकी संबोधले आहे. कट्टरपंथी नेत्यांनी म्हटले की, ‘आसिफ यांनी जर्मनीत काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करावयास हवा होता. मात्र, ते भारताचे भाट  बनून बोलत आहेत.’
 
ट्रम्प यांच्यावर टीका
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या निमित्ताने अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, सकाळपासून अनेकदा मुस्लिम दहशतवादी शब्द ऐकत आलो आहे. राष्ट्रपती ट्रम्पही सतत हेच सांगत असतात. ते इस्लामोफोबियाला प्राेत्साहन देत आहेत. दहशतवादाचे इस्लामी दहशतवादाच्या रूपात ब्रँडिंग करत आहेत.
 
ख्वाजा आसिफ यांना ठरवले भारताचा भाट
जागतिक मंचावर प्रथमच हाफिज सईदला अतिरेकी ठरवणारे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर पाकिस्तानी मूलतत्त्ववादी प्रचंड खवळले आहेत. मूलतत्त्ववाद्यांनी आसिफ यांना भारताचा भाट ठरवत  आगपाखड केली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांत पाक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष मौलाना समीउल हक, शाह बुग्ती, सरदार अतीक अहमद खान, लियाकत बलूच, सिनेटर मोहंमद अली दुर्राणी व हाफिज हमदुल्लाह, मियां मुहमुद उर रशीद, सरदार लतीफ अहमद खोसा, जमशेद अहमद दश्ती, शाह ओवैसी नूरानी, हाफिज अब्दुल गफूर रोपारी आदींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...