आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी 17 वर्षांत पोर्तुगालला जाणारे पहिले PM; उद्या ट्रम्प यांची भेट घेणार, 27 जून रोजी नेदरलँडमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिस्बन - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी लिस्बनला पोहोचले. त्यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांच्याशी चर्चा केली. मोदी द्विपक्षीय दौऱ्यावर पाेर्तुगालला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. अटलबिहारी वाजपेयी २००० मध्ये पोर्तुगालला गेले होते. मात्र, तो द्विपक्षीय दौरा नव्हता.
 
मोदी पोर्तुगालला पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने पंतप्रधान कोस्टा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य व दहशतवाद रोखण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. चर्चेनंतर काही वेळाने मोदींना खास मेजवानी देण्यात आली. त्यात गुजराती डिशचा समावेश होता. जेवणानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पोर्तुगालला जाण्याआधी मोदी यांनी कोस्टांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंधात गतिशीलता आल्याचे म्हटले आहे. भारतीय वंशाचे कोस्टा या वर्षी जानेवारी भारतात आले होते. पोर्तुगालने २००५ मध्ये दहशतवादी अबू सालेम व मोनिका बेदीचे भारतात प्रत्यार्पण केले होते.
 
ट्रम्प यांची पहिल्यांदा भेट घेणार मोदी 
पंतप्रधान मोदी शनिवारी पोर्तुगालहून अमेरिकेला रवाना झाले. तिथे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये रात्रीभोजनाचे आयोजन केले आहे. मोदी हे ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये रात्रीभोजन करणारे जगातील पहिले नेते असतील. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत एच १ बी व्हिसा, अणुकरारासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. ट्रम्प प्रशासनाने सुरुवातीच्या टप्प्यात भारताला जास्त महत्त्व दिले नाही. मात्र, आता त्यांचे धोरण बदलले आहे. द्विपक्षीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बळकट भारत, अमेरिकेसाठी फायदेशीर आहे. ट्रम्प आणि मोदी आपल्या संबंधांतून नवी उंची गाठू शकतील. त्याआधी मोदी यांनी शुक्रवारी म्हटले होते की, मी ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून वॉशिंग्टन दौऱ्यावर जात आहे. आमच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. मी भारत आणि अमेरिकेतील भागीदारी आणखी मजबूत करण्याबाबत आशावादी आहे.
 
मोदी २७ जून रोजी नेदरलँडमध्ये 
पंतप्रधान मोदी २७ जून रोजी नेदरलँडमध्ये राहतील. दोन्ही देशांनी राजकीय संबंधांची ७० वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी पंतप्रधान मार्क रूट तसेच सम्राट विल्यम अलेक्झांडर यांची भेट घेतील. नेदरलँड युरोपीय संघात भारताचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे.
बातम्या आणखी आहेत...