जम्मू - ताबा रेषेवर तैनात असलेल्या जवानांसाठी दिले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानावरून वाद उद््भवला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. या जवानाचेच सन २०१० मध्ये बेशिस्त वर्तनामुळे कोर्टमार्शल झाले होते, असेही स्पष्ट झाले आहे.
कॉन्स्टेबल तेजबहादूर यादव याने निकृष्ट अन्न दिले जात असल्याची तक्रार केली होती. याबाबतचे व्हिडिओ त्याने सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड केले होते. विशेष म्हणजे या जवानाचे बेशिस्त वागणुकीबद्दल तसेच वरिष्ठांवर खोटेनाटे आरोप केल्याबद्दल सन २०१० मध्ये कोर्टमार्शल झाले होते. आता त्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला असून ३१ जानेवारी रोजी त्याची सेवा समाप्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी माहिती देताना सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी. के. उपाध्याय यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत ताबा रेषेवरील दुसऱ्या कोणत्याही जवानाने निकृष्ट अन्न मिळत असल्याबद्दल तक्रार केल्याचे आढळून आलेले नाही. विशेष म्हणजे ताबा रेषेवरील लष्करी छावणीला उपमहासंचालकांसह काही अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा स्वत: यादव यानेही याबाबत तक्रार नोंदवलेली नाही. यादव प्रचंड व्यसनी असल्याचेही चौकशीतून समोर येत आहे.
व्यसन, आदेश धुडकावण्याची सवय
उपाध्याय म्हणाले, मुळात यादव व्यसनी आहे. तो कायम नशेत असतो. शिवाय, तो वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करत नाही. त्याला कुणी आज्ञा देणे म्हणजे अवमान वाटतो. सन २०१० मध्ये त्याचे कोर्टमार्शल झाले होते. त्याच्या कुटुंबाचा, मुलांचा विचार करून त्याला नोकरीवर कायम ठेवण्यात आले. मात्र, त्याला ८९ दिवसांचा सश्रम कारावास ठोठावण्यात आला होता.