आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी टीव्ही हल्लाप्रकरणी इम्रान खान, कादरींना १७ नोव्हेंबरपर्यंत अटक करण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या दहशतवादी प्रतिबंधक न्यायालयाने क्रिकेटपटू तथा तेहरिक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान व मौलाना ताहिरूल कादरी यांना अटक करण्याचे आदेश बजावले आहेत.

१७ नाेव्हेंबरपर्यंत ही कारवाई करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. २०१४ मध्ये सरकारच्या विरोधात पाकिस्तानी टीव्हीच्या मुख्यालयावरील हल्ल्यासंबंधी त्यांच्यावर खटला चालू आहे. या प्रकरणात दोघांवर अगोदरपासूनच अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायमूर्ती कौसर अब्बास जैदी यांनी पोलिसांनी फटकारले आहे. खान व कादरी यांना हल्ल्यात सामील असल्याचा ठपका ठेवला आहे.

या प्रकरणात ६८ जणांवर आरोप आहेत. त्या सर्वांना १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ सप्टेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून हटविण्याची मागणी करत खान व कादरी यांनी आपल्या ४०० समर्थकांसह प्रक्षेपण बंद करण्यासाठी पी टीव्ही मुख्यालयावर हल्ला केला होता. त्यापैकी ७० जणांच्या विरोधात खटला दाखल केला होता. राजकीय क्षेत्रात हा खटला खूप चर्चिला जात आहे. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानात पंतप्रधान शरीफ यांच्या विरोधात आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न इम्रान खान यांच्याकडून केला जात आहे.

२ नोव्हेंबर राेजी मोठे आंदोलन
इम्रान खान यांनी २ नाेव्हेंबर रोजी शरीफ यांच्या विरोधात बंदची हाक दिली आहे. शरीफ यांची परदेशात संपत्ती आहे. त्याचबरोबर त्यांनी आपला पैसा गैरमार्गाने परदेशी बँकांमध्ये दडवला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पद सोडले पाहिजे, अशी मागणी खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ यांच्या पक्षाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने हे आदेश काढले आहेत. त्यामुळे इस्लामाबादमधील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...