आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-जर्मनी परस्परांसाठी बनलेली राष्ट्रे : नरेंद्र मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन  - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी मंगळवारी भारत-जर्मनी मैत्री मजबूत असल्याचे संकेत दिले. मोदी म्हणाले की, भारत आणि जर्मनी परस्परांसाठी बनलेली राष्ट्रे आहेत. तर मर्केल म्हणाल्या की, वेळोवेळी  आपण विश्वासार्ह मित्र असल्याचे भारताने सिद्ध केले आहे.  दोन्ही देशांच्या दरम्यान प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत ८ सामंजस्य तर ४ इतर करारांवर सहमती झाली. मोदी आणि  मर्केल यांच्या चँसलर कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर दहशतवाद विरोधी संयुक्त लढा, व्यापारी संबंध दृढीकरण, कौशल्य विकास तसेच हवामान बदलांच्या विषयावर प्रामुख्याने भर देण्यात आला. सायबर धोरण, विकास योजना, शाश्वत शहरी विकास, कौशल्य विकास,डिजिटलायझेशन, रेल्वे सुरक्षा, व्यावसायिक प्रशिक्षणासंबंधीचे करार झाले आहेत. 
 
पंतप्रधान मोदी ४ देशांच्या ६ दिवसीय दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी ते सोमवारी बर्लिन येथे दाखल झाले. सोमवारी रात्री चॅन्सलर अँजेला यांनी मोदींच्या सन्मानार्थ रात्रभोजनाचे आयोजन केले होते. मंगळवारी त्यांचे अधिकृतरीत्या स्वागत करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी भारत-जर्मनी इंटरगव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स (आयजीसी)च्या बैठकीत उभय देशांच्या संबंधांचा आढावा घेतला. द्विपक्षीय सामरिक संबंध मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. नंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रपरिषद घेतली. यापूर्वी आयजीसीचे आयोजन ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.  
 
परकीय थेट गुंतवणूक, व्यापार सहकारी म्हणून युरोपीय संघातील जर्मनी हे प्रमुख मित्रराष्ट्र असल्याचे मोदी म्हणाले. १६०० जर्मन कंपन्या आणि ६०० जर्मन संयुक्त प्रकल्प भारतात आजघडीला सक्रिय आहेत. मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, कुशल भारत, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी जर्मनीचे सहकार्य महत्वाचे अाहे.  मोदी- मर्केल यांनी इंडो जर्मन बिझनेस समीट २०१७ च्या उद््घाटनापूर्वी आघाडीच्या उद्योजकांची बैठक घेतली. जर्मनीचे राष्ट्रपती डॉ. फ्रँक वॉल्टर स्टेनमिएर यांच्या कॅसल बेल्लेव्ह्यू या अधिकृत निवासस्थानी मोदी भेट देतील. त्यानंतर ते स्पेनला रवाना होणार आहेत\\सोमवारी मोदींनी जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासह अनौपचारिक चर्चा केली. मोदींच्या सन्मानार्थ मर्केल यांनी बर्लिनजवळील स्कॉलॉस मेसेबर्ग येथे रात्र भोजनाचे आयोजन केले होते.  
 
जर्मन कंपन्यांसाठी खुले धोरण : पंतप्रधान मोदींनी भारत-जर्मनी उद्योजकांच्या बैठकीत म्हटले की, आमचे आर्थिक सहकार्य मजबूत आहे. याला अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही जर्मन कंपन्यांचे स्वागत करतो. जर्मनी मेक इन इंडियाला यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे. 
 
२०१५ नंतर जर्मनीने २ अब्ज डॉलर्स गुंतवले
गेल्या दोन वर्षांत जर्मनीने परकीय थेट गुंतवणुकीअंतर्गत भारतात २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. हा आकडाच पुरेसा सूचक असल्याचे पत्रपरिषदेत जर्मनीतील भारताच्या राजदुत मुक्ता दत्ता-तोमर यांनी म्हटले. सोमवारी उभय नेत्यांत ३ तास चर्चा झाली. यात जागतिक मुद्द्यांवर भूमिका मांडण्यात आल्या. ब्रेक्झिटच्या भारत-जर्मनी संबंधावर होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा झाली. युरोपीय संघ एकजूट राहणे हे जगाच्या राजकीय स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे मोदी या वेळी म्हणाले.  
 
जीएसटीचा निर्णय स्वागतार्ह 
भारताच्या विकास कार्यक्रमांत जर्मनी कोणत्या स्तरावर सहकार्य करेल याविषयी सोमवारी रात्र भोजनादरम्यान उभय नेत्यांत चर्चा झाली. भारतातील आर्थिक सुधारणांची प्रशंसा जर्मनीने केली आहे. जीएसटीच्या निर्णयाचे जर्मनीने स्वागत केल्याचे जर्मनीतील भारताच्या राजदूत मुक्ता दत्ता -तोमर यांनी सोमवारी रात्री घेतलेल्या  पत्र परिषदेत सांगितले. व्यापारी आणि औद्योगिक संबंध दृढीकरणावर मोदींचा भर आहे. २०१५ नंतर जर्मन उद्योगांना अनुकूल सुविधा आणि फास्ट ट्रॅक धोरण भारताने अवलंबल्याबद्दल जर्मनीने समाधान व्यक्त केले आहे, असे मुक्ता दत्ता यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...