आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने ऐकल्यास निर्बंध हटवणार : ट्रम्प, आेबामांनी गेल्या महिन्यात घेतला होता निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रशियाने अमेरिकेला सहकार्य केल्यास रशियावरील निर्बंध निश्चितपणे हटवले जातील. तूर्त मात्र हे निर्बंध राहणार आहेत, असे अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले, २० जानेवारीला पदभार घेतल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेण्याची तयारी आहे. अखंड चीन धोरणावर देखील ट्रम्प यांनी ठामपणे काहीही सांगितले नाही. चीन आपले चलन आणि व्यापार धोरणात काय बदल करतो, हे पाहिल्यानंतर त्यावर काही बोलता येऊ शकेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला एक तास दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी अनेक विषयांवर दिलखुलास मते व्यक्त केली. रशिया अमेरिकेसोबत चांगल्या प्रकारचे वाटचाल करण्यास तयार असल्यास निर्बंधाची गरजच काय? राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी पद सोडण्याच्या काही आठवडे अगोदर रशियावर निर्बंध लागू केले आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवून आेबामा यांनी हे निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले. आेबामा यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला. जनतेच्या मतांचा कौल मिळाला असला तरी इलेक्टोरल कॉलेजच्या मतांमुळे पराभव झाला होता.
 
ट्रम्प यांचे सल्लागार होते रशियाच्या संपर्कात
बराक आेबामा यांनी रशियावर निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले. त्याच वेळी भावी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार रशियाच्या संपर्कात होते. ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांनी २९ डिसेंबरला वॉशिंग्टन येथील रशियाचे राजदूत सर्गेई किसल्याक यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्या अगोदर २८ डिसेंबरलादेखील रशियन राजदूताशी चर्चा झाली होती.