आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या विमानतळावर हिंदीतून स्वागत, ‘धन्यवाद’चे फलक झळकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेद्दाह- सौदी अरेबियाच्या सरकारने भारतीयांप्रति आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या किंग अब्दुल अजीज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता हिंदीतून शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथील डिजिटल फलकांवर आणि पार्किंग परिसरातील सूचना हिंदीतूनच दिल्या जात आहेत. सौदीच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि सौदी अरेबियातील नागरिकांमध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. दोन्ही देशांतील व्यापारी संबंधही तितकेच दृढ आहेत आणि सौदीत सर्वाधिक कर्मचारी भारतातीलच आहेत. आमच्या मनातील भारतीयांप्रतिचा आदरभाव आम्ही "नमस्ते', "स्वागत', "धन्यवाद' फलक लावून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियात इंग्रजीसोबत स्थानिक अरेबिक भाषेलाच अधिक महत्त्व आहे. मात्र, आता हिंदीलाही त्यांच्या बरोबरीचे स्थान देण्यात आले आहे.

चांगल्या प्रतिमेसाठी
अलीकडेच सौदीच्या मुत्सद्द्याने दोन नेपाळी महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे आहे. ते पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उमटल्याचे पाहायला मिळाले होते. ही घटना भारतात घडली. त्यामुळे सौदीने भारतासोबतचे संबंध कायम राहावेत, यासाठी हा एक प्रयत्न केला असावा.

तेलव्यवसायाचे माहेरघर असलेल्या सौदी अरेबियामध्ये सुमारे २७ लाख ३० हजार भारतीय कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश संशोधन क्षेत्रात असून त्यांच्यामुळे साैदीच्या अर्थव्यवस्थेस मोठा हातभार लागला आहे. शिवाय, भारत आणि सौदीदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सौदी सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

४८ अब्ज रुपयांचा झाला व्यापार
भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही राष्ट्रांत २०१३-१४ वर्षात सुमारे ४८ अब्ज रुपयांचा व्यापार झाला. २०१०-११ मध्ये हा व्यापार २५ अब्जांचा होता. भारतीय दूतावासाकडून प्राप्त माहितीनुसार, सौदी अरेबिया हे भारताचे चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्यापारी राष्ट्र आहे. भारत सौदीकडून २० टक्के कच्चे तेल आयात करतो अाणि ऊर्जेसंदर्भातही दोन्ही देशांत करार आहेत.