आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी घटना चिंता वाढवतात, संयुक्त राष्ट्राच्या नूतन सरचिटणीसांची भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु मी काही जादूगार नाही, असे स्पष्ट करतानाच जगभरात वाढत असलेल्या दहशतवादी घटनांमुळे चिंता निर्माण करणारी परिस्थिती पाहायला मिळू लागली आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिआे गुटेरिस यांनी म्हटले आहे.
  
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ६७ वर्षीय गुटेरिस यांचा बुधवारी कामकाजाचा पहिला दिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी कार्यालयातील सहकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु मी काही जादूगार नाही, हे लक्षात ठेवा. खरे तर आपल्या सर्वांनाच अतिशय कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात संघर्ष दिसून येत आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी असला तरी त्याचे आंतरसंबंध  मात्र स्पष्ट आहेत. जगभरात दहशतवादी कारवाया होताना दिसतात. 
 
एकजुटीने सोडवणूक शक्य : मी काही जादूगार नाही. परंतु दहशतवादासारख्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. एकजुटीतून दहशतवादाच्या समस्येचा नायनाट करणे शक्य होणार आहे. त्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे, असे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरिस  यांनी म्हटले आहे.  गुटेरिस यांनी बान की मून यांची जागा घेतली अाहे.

शांततेचे आवाहन  
गुटेरिस यांनी संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसपदाची सूत्रे दोन दिवसांपूर्वी हाती घेतली होती. त्या वेळी त्यांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देताना जगात शांतता प्रस्थापित करण्याचा नूतन वर्षाचा संकल्प करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 
फेररचनेचे संकेत  
संयुक्त राष्ट्राच्या फेररचनेची अनेक देशांची मागणी आहे. त्यानुसार नजीकच्या काळात संघटनेच्या व्यवस्थेत अपेक्षित असे बदल होतील. नोकरशाहीमुळे कामांत अडथळे आले.  त्यात बदल करण्याच्या दिशेने सक्रिय असल्याचे संकेत गुटेरिस यांनी दिले. 
बातम्या आणखी आहेत...