आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात मिनिटांत गोळीबार करून दहशतवादी फरार, तुर्कीतील हल्ला प्रकरण, आठ संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा/ बडोदा- तुर्कीत इस्तंबूलच्या नाइट क्लबमध्ये नववर्षाच्या जल्लोषाच्या वेळी सांताक्लॉज बनून आलेला दहशतवादी टॅक्सीने आला होता, त्याने फक्त सात मिनिटांत १८० गोळ्या झाडल्या आणि फरार झाला. पळून जाण्याआधी त्याने आपला ओव्हरकोट तेथेच फेकून दिला. या अंदाधुंद गोळीबारात दोन भारतीयांसह ३९ जण ठार झाले होते. इसिस या दहशतवादी संघटनेने सोमवारी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, पण तुर्कीच्या स्थानिक माध्यमांनी हल्लेखोर किरगिझस्तान किंवा उझबेकिस्तानचा असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी सोमवारीही त्याचा शोध घेतला. पोलिसांनी हल्लेखोराला मदत केल्याच्या संशयावरून ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यात मुंबईचे बिल्डर आणि चित्रपट निर्माता अबीस हसन रिझवी आणि गुजरातची फॅशन डिझायनर खुशी शहा यांचा मृत्यू झाला. रिझवीचे वडील अख्तर हसन रिझवी हे राज्यसभेचे खासदार होते. खुशीचे कुटुंबीय बडोद्यात राहते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खुशीचे वडील अश्विन शहा यांना त्यांच्या मुलीचा मृतदेह आणण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. अश्विन शहा यांचा केमिकलचा व्यवसाय आहे. खुशीच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. खुशीने अमेरिकेतून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता आणि काही वर्षांपूर्वी मुंबईत आपले पहिले बुटीक उघडले होते.

खुशीचे भाऊ अक्षय शहा आणि एक नातेवाईक हिरेन चौधरी इस्तंबूलला रवाना झाले. त्यांच्याकडे व्हिसा नव्हता. इस्तंबूलाल पोहचल्यावर व्हिसाची व्यवस्था करण्यास तेथील राजदूतांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...