आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ट्रम्पविरोधी मीडियाला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेशबंदी, पहिल्यांदाच प्रेस ब्रीफिंग बंद कॅमेऱ्यासमोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 वॉशिंग्टन-  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमांना शनिवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत प्रवेश करण्यास नाकारण्यात आला.  त्यामुळे ट्रम्प व प्रसारमाध्यमे यांच्यातील दरी शनिवारी आणखी एका पावलाने वाढली आहे.  
 
काही माध्यमसंस्था फेक न्यूज प्रसृत करणाऱ्या आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला. आरोपाच्या काही तासांनंतर ट्रम्प यांनी सीएनएन, बीबीसी, द न्यूयॉर्क टाइम्ससह अनेक बड्या मीडिया समूहांना प्रेस ब्रीफिंगसाठी प्रवेश करण्यास मज्जाव केला. कॉन्झर्व्हेटिव्ह अॅक्शन कॉन्फरन्समध्ये मीडियाचा कडक शब्दांत समाचार घेतला. 
 
हे सर्व माध्यम समूह ट्रम्प यांच्या नव्हे तर अमेरिकी जनतेच्या विरोधात आहेत. ते जनतेचे शत्रू आहेत, असे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. त्यानंतर नियमितपणे कॅमेऱ्यासमोर होणारी प्रेस ब्रीफिंग बंद कॅमेऱ्यासमोर करण्यात आली. वृत्तसंस्था एपीने या निर्णयाचा निषेध करताना पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. 
 
ब्रीफिंगसाठी परवानगी नाकारलेली ही माध्यमे : सीएनएन, द न्यूयॉर्क  टाइम्स, द हिल पॉलिटिको, बझफीड, द डेली मेल, बीबीसी, लॉस एंजलिस टाइम्स, द न्यूयॉर्क डेली न्यूज, द गार्डियनला परवानगी दिली नव्हती.
 
परवानगी मिळालेली माध्यमे : वॉशिंग्टन टाइम्स, एबीसी, सीबीएस, एनबीएस,फॉक्स, रॉयटर्स, ब्लूमबर्ग. त्याशिवाय ट्रम्प यांच्या बाजूने वृत्त प्रसारित करणारे छोटे वृत्तपत्र वन अमेरिका न्यूज नेटवर्कलाही परवानगी मिळाली होती. 
 
‘सात मुस्लिम देशांकडून धोका नाही’ : सात मुस्लिम देशांकडून अमेरिकेला धोका आहे, हा दावा  अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने फेटाळला आहे. अशा प्रकारचा धोका असल्याबाबतचा सबळ पुरावा आपल्याकडे नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  
 
नोकरीसाठी धोकादायक नियम  रद्द होणार 
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी आणखी एक आदेश जारी केला. नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत असे नियम रद्द करण्यात यावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी त्यांनी कार्यगटाची स्थापना केली आहे. देशात उद्योगाच्या दृष्टीने अतिशय पोषक वातावरण निर्माण करावे, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नवीन कंपन्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.  
ट्रम्प यांना लोकशाहीचा अर्थ कळत नाही  

- आपल्या विरोधात टीका करणाऱ्या मीडियावर एक राष्ट्राध्यक्षच हल्ला करतात. तेव्हा याचा अर्थ त्यांना वास्तवात लोकशाहीचा अर्थच कळत नाही. बर्नी सँडर्स, सिनेटर.  
 
मीडिया विरोधात नाही  
- मी मीडियाच्या विरोधात नाही. वृत्तपत्रांच्या विरोधातही नाही. वाईट बातम्यांच्या मी विरोधात नाही. पण चांगल्या बातम्या मला आवडतात. मात्र तशा मला जास्त दिसत नाहीत. मी केवळ फेक न्यूजच्या विरोधात आहे. अशा गोष्टी त्यांना सोडाव्या लागतील.  डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका. 
 
कदापि स्वीकारार्ह नाही  
- व्हाइट हाऊस घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र व नि:पक्ष माध्यमांच्या विरोधात सक्रियपणे मोहीम चालवते ही गोष्ट अतिशय क्लेशदायी व कदापि स्वीकारली जाऊ शकत नाही.  
जॅफ्रे बॅलो, अध्यक्ष, नॅशनल प्रेस क्लब.  
बातम्या आणखी आहेत...