आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदी-मोदी’च्या धर्तीवर आता अमेरिकेत ‘ट्रम्प-ट्रम्प’चा जयघोष !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी पाठिंब्याचे फलक हाती घेतले होते. - Divya Marathi
अध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी पाठिंब्याचे फलक हाती घेतले होते.
डेनव्हर - अमेरिकेतही आता भारतातील ‘मोदी-मोदी’ या घोषणांच्या धर्तीवर ‘ट्रम्प-ट्रम्प’ अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या अनेक शहरांत चार मार्च रोजी ‘मार्च ४ ट्रम्प’ निघाला. हजारो लोकांनी ट्रम्प यांचे कटआऊट आणि ‘डिप्लोरेबल्स फॉर ट्रम्प’च्या घोषणांसह निदर्शने केली. निदर्शनांना विरोध करणाऱ्या १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. कोलोरॅडो स्टेट कॅपिटॉ येथून न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर आणि वॉशिंग्टन स्मारकापर्यंत रॅली काढण्यात आल्या.  

थॉर्नटन येथील लेखापाल चेल्सी थॉमस आपल्या कुटुंबीयांसह आणि ट्रम्प यांच्या मोठ्या कटआऊटसह ‘मार्च ४ ट्रम्प’ रॅलीत सहभागी होण्यासाठी डेनव्हरला आल्या होत्या. मिनेसोटा, टेनेसी स्टेट कॅपिटॉलमध्ये निदर्शनांना विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वॉशिंग्टनमधील ऑलिम्पियात ट्रम्प समर्थक आणि विरोधक अशा दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. बर्कले, कॅलिफोर्नियात निदर्शकांनी हेल्मेट, गॅस मास्क, काळे चष्मे घातले होते. लोकांच्या हातात अमेरिकेचे झेंडे होते. ओहायोत ५७ वर्षीय ट्रम्प समर्थक मार्गारेट होवे म्हणाल्या की, लवकरच नागरी युद्ध होईल अशी भीती वाटत आहे, पण आम्ही ते रोखू, कारण बहुतांश लोक ट्रम्प यांच्यासोबत आहेत.’  
 
ट्रम्प यांचा ताफा रोखला :  पाम समुद्र किनाऱ्यावरील मार-ए-लागोजवळ ट्रम्प समर्थक आणि विरोधक यांनी परस्परांवर अपशब्दांचा भडिमार केला. अध्यक्ष ट्रम्प यांना आपल्या समर्थकांचे अभिनंदन स्वीकारता यावे म्हणून त्यांचा ताफा काही काळासाठी रोखण्यात आला होता.
 
‘तुम्ही पत्नीला मारहाण करता का?’
ह्यूस्टनमधील रिपब्लिकन संसद सदस्य जॉन बॅनेट हे त्यांच्या भेटीसाठी आलेल्या मुस्लिमांना ‘तुम्ही पत्नीला मारहाण करता का?’ असा प्रश्न विचारत आहेत. त्याशिवायही अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बॅनेट यांनी एक प्रश्नावलीच तयार केली आहे. राज्यात ‘तिसऱ्या मुस्लिम दिना’निमित्त येणाऱ्या मुस्लिमांकडून या प्रश्नांची उत्तरे मागवली जात आहेत. आपल्यालाही हे प्रश्न विचारले जात असून इस्लामबाबतची त्यांची भीती त्यातून दिसते, अशी तक्रार अनेक मुस्लिम विद्यार्थीही करत आहेत.
 
ट्रम्प यांचे दूरध्वनी टॅप केले नाहीत : बराक ओबामांचा प्रवक्त्याचे स्पष्टीकरण
माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणुकीच्या वेळी आपले दूरध्वनी टॅप केले होते, असा आरोप अध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. त्यांनी तसे अनेक ट्विट सतत केले होते. ओबामांचे प्रवक्ता केव्हिन लेव्हिस यांनी रविवारी हे आरोप निराधार असल्याचे सांगितले. ओबामांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
 
नव्या प्रवास बंदी अध्यादेशावर आज स्वाक्षरीची शक्यता
 
मागील प्रवास बंदी आदेशावर न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ट्रम्प हे सोमवारी नव्या आदेशावर स्वाक्षरी करू शकतात. ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ट्रम्प यांनी २७ जानेवारीला सात मुस्लिमबहुल देशांच्या लोकांनी अमेरिकेत येण्यावर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनेक राज्यांनी या आदेशाला आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती. नव्या प्रशासकीय आदेशात काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी मार-ए-लागो येथे गेले आहेत. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर अवैधरीत्या राहणाऱ्या सर्व विदेशी नागरिकांना अटक करण्याच्या कारवाईला वेग आला आहे. मेक्सिकोतून अवैधरीत्या आलेल्यांना परत पाठवले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...