आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रवासबंदी आदेश: ट्रम्प यांच्या नव्या आदेशाला हवाई द्वीपसमूहाचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होनोलुलू/ वॉशिंग्टन - कायदेशीर डावपेचांपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या प्रवासबंदी आदेशावर स्वाक्षरी केली होती, पण आता हवाई द्वीपसमूहाने या आदेशालाही न्यायालयात आव्हान दिले आहे. असे पाऊल उचलणारे ते अमेरिकेतील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी बुधवारी खटला दाखल केला. त्यांच्या मते, या नव्या आदेशामुळे राज्यात राहणारे मुस्लिम, विदेशी विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यावर परिणाम होईल. हवाई द्वीपसमूह हे अमेरिकेचे ५० वे राज्य आहे आणि तेथे राज्यपाल आणि उपराज्यपाल हे दोघेही डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत.  

अध्यक्ष ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घातली होती. या आदेशाला अनेक राज्यांनी आव्हान दिले होते. अपील कोर्टानेही त्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी नवा प्रवासबंदी आदेश जारी केला आहे. त्यात इराक वगळता इतर देशांवर प्रवासबंदी लागू करण्यात आली. हवाईचे महाधिवक्ता डग्लस चिन आणि मुस्लिम संघाच्या इमामाने त्याविरोधात खटला दाखल केला आहे.  
 
होनोलुलूचे जिल्हा न्यायाधीश डेरिक वॉटसन यांनी राज्याच्या खटल्याला परवानगी दिली.त्यावर १५ मार्च रोजी सुनावणी होईल. ट्रम्प यांचा नवा आदेश १६ मार्चपासून लागू होणार आहे. चिन यांनी सांगितले की, राज्य सरकारने १,५०,००० डॉलर खर्च करून एका बाहेरच्या कायदेशीर कंपनीला खटला लढण्यासाठी आणले आहे. बाहेरील लोकांना येण्यास बंदी घालणे हे योग्य धोरण नाही, हे हवाईच्या लोकांना माहीत आहे. अमेरिकेच्या कायदा विभागाने हवाईच्या या कारवाईवर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.
 
हवाई द्वीपसमूह महत्त्वाचा का? 
प्रशांत महासागरातील हवाई द्वीपसमूहातील राजेशाही संपवून अमेरिकेने १८९३ मध्ये त्यावर कब्जा केला होता आणि १८९८ मध्ये त्याला अमेरिकेत सामावून घेतले होते. तेथे दुसऱ्या जागतिक महायुद्धात पहिल्यांदा पर्ल हार्बरवर जपानने हल्ला केला होता.
 
- तेथे नेहमीच परदेशी नागरिकांना भेदभावरहित वागणूक मिळाली आहे.
-२५ टक्के नागरिक विदेशात जन्मलेले आहेत.
-१ लाख लोक गैरनागरिक आहेत.
- २० टक्के कामगार परदेशात जन्मलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...