आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची पाणबुडी द. कोरियात दाखल; मुत्सद्द्यांची व्यूहरचना, सैन्य स्थापना दिनानिमित्ताने उत्तर कोरियाचा सराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योगाँग- क्षेपणास्त्राने सज्ज असलेली अमेरिकेची पाणबुडी मंगळवारी दक्षिण कोरियाच्या किनाऱ्यावर दाखल झाली. पाणबुडीसोबत अमेरिका, जपानचे मुत्सद्दीही पोहोचले आहेत. उत्तर कोरिया लष्कर स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या पातळीवर शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदेशात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर कोरियाने मंगळवारी सैनिकांचा सराव कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने कोरिया क्षेपणास्त्र चाचणी घेऊ शकेल, असा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडल्याचे सकाळपर्यंत दिसून आले नाही. उत्तर कोरियात सामान्यपणे एखाद्या उत्सवाच्या दिवशी असतो, त्याप्रमाणे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त ठिकठिकाणी सामूहिक नृत्याचे कार्यक्रम झाले. सांगितीक कार्यक्रमापूर्वी लष्करी व नागरी अधिकाऱ्यांची राष्ट्रीय बैठक घेण्यात आली होती. त्यात उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री जनरल पाक याँग सिक अध्यक्षस्थानी होते. देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात परदेशी शक्तींनी आक्रमण केल्यास त्यास कडक प्रत्युत्तर देण्याचा संकल्प बैठकीतून करण्यात आला. हा इशारा अमेरिकेला होता. कोरियन प्रदेशातील तणाव वाढू लागला आहे. कदाचित अणु युद्धाला ताेंड फुटू शकते. कारण अमेरिकेची लढाऊ पाणबुडी दाखल झाली आहे. अमेरिकेने कोरियन प्रदेशात आक्रमक पवित्रा घेता आहे, असे सिक यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची उपस्थितीत नव्हती. सैन्य स्थापना दिनाचे हे ८५ वे वर्ष होते. वर्धापनाच्या निमित्ताने सैनिकांचा सरावही झाला.

उत्तर कोरियाच्या धोरणांची परीक्षा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर दबाव वाढवण्याची रणनीती आखली आहे. १५ एप्रिल रोजी देशाचे संस्थापक किम संग  यांच्या १०५ व्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. ती अयशस्वी झाली होती. परंतु उत्तर काेरियाने आण्विक कार्यक्रम थांबवलेला नाही. कोरिया कशा प्रकारची भूमिका घेते याची परीक्षा म्हणून अमेरिकेने पाणबुडी पाठवली असल्याचे मानले जाते.

विश्रांतीसाठी थांबा
यूएसएस मिशिगन नावाची पाणबुडी नेहमीच्या सागरी मार्गावरून जाताना बुसान येथील बंदरावर थांबली आहे. विश्रांतीसाठी तिचा हा थांबा असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले.
 
टोकियोत महत्त्वपूर्ण बैठक
उत्तर कोरियासंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी टोकियोत बड्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात अमेरिकेचे जोसेफ यून, जपानचे केंजी कानासुगी, दक्षिण कोरियाचे किम हाँग-क्यून हे मुत्सद्दी सहभागी झाले होते. तीनही देशांनी परस्परांना सहकार्य करण्यावर सहमती दर्शवतानाच तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करण्याचेही प्रतिनिधींनी ठरवले.
 
बातम्या आणखी आहेत...