दुबई - संयुक्त अरब अमिरातीमध्ये यंत्रमानवाच्या साह्याने आैषधी वाटपाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आैषधींची माहिती मिळाल्यानंतर एका मिनिटात रोबोट त्याचे एकाच वेळी वाटप करेल. त्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे.
सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा-सुविधा देण्याचे एक धोरण तयार केले आहे. २०१६ ते २०२१ अशी त्याची योजना तयार करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. समाजात आनंद असावा. समाज निरोगी असला पाहिजे, असा त्यामागील उद्देश आहे, असे दुबई आरोग्य प्राधिकरणाचे संचालक हुमैद अल कातामी यांनी सांगितले. रोबोटद्वारे आैषधी वाटपाची सेवा रविवारपासून रुग्णांना मिळणार आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रशीद हॉस्पिटलमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. रोबोटच्या आैषधी वाटपावर निगराणी ठेवण्याचे काम फार्मासिस्टना करावे लागणार आहे, अशा सरकारच्या सूचना आहेत. देशात पोलिस ठाणे, विमानतळ इत्यादी ठिकाणीदेखील यंत्रमानव सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. त्यांच्यामार्फत वेगाने आणि अचूक काम होते.
कशा पद्धतीने काम करते?
३५ हजारांवर आैषध-गोळ्यांची साठवणूक करून एकाच वेळी १२ प्रकारच्या प्रिस्क्रिप्शनचे एका मिनिटात वितरण करण्याची क्षमता रोबोटमध्ये आहे. ही सेवा रविवारपासून यूएईमध्ये उपलब्ध होणार आहे. डाॅक्टरांकडून मिळणारे प्रिस्क्रिप्शनदेखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे असेल. त्यामुळे ही सुविधा पेपरलेस असेल.
स्मार्ट फार्मसीमुळे प्रतीक्षेत घट
-यंत्रमानवाच्या साह्याने एकाच वेळी अनेक प्रकारच्या आैषधी रुग्णांना वाटप करणे शक्य झाल्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वेळेची बचत होणार आहे. अन्यथा रुग्णांना बराच वेळ प्रतीक्षेत राहावे लागते. रोबोटमुळे प्रतीक्षेची वेळ कमी होईल.
अली अल सईद, फार्मा विभागाचे संचालक.