आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन- पश्चिम मोसूलमध्ये अडकलेल्या 3 लाख 50 हजार मुलांना वाचवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- मोसूलला ताब्यात घेण्यासाठी इराकने नवी लष्करी कारवाई सुरू केली आहे. परंतु युद्धभूमी बनलेल्या शहराच्या पश्चिमेकडे मात्र ३ लाख ५० हजारांवर मुले अडकली आहेत. इराक, अमेरिका व ब्रिटनच्या संयुक्त लष्कराने निष्पाप मुले व त्यांच्या कुटुंबांना कोणत्याही परिस्थितीत वाचवले पाहिजे, असे आवाहन ‘सेव्ह द चिल्ड्रन’ ने केले आहे.  दरम्यान, अमेरिकेने इसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले वाढवले. मात्र कोणत्याही सैन्यासाठी सर्वात कठीण लढाई, असल्याचे मत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. 
 
लाखो मुले व त्यांच्या कुटुंबाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी इराकी फौजांनी घेतली पाहिजे. त्याचबरोबर युद्धात शाळा व रुग्णालयाची हानी होणार नाही, याबद्दलही सतर्क राहिले पाहिजे. शहरातून पळ काढणे हा अनेक कुटुंबांसाठीचा पर्याय नाही. अनेक लोक अन्नपाण्याविना राहत आहेत. असंख्य लोकांना आैषधी उपलब्ध होत नाही, असे सेव्ह द चिल्ड्रनचे संचालक मॉरिझिआे क्रिव्हालेरो यांनी सांगितले. 
 
मोसूलमधील मुलांना बॉम्ब, गोळीबार व भूक अशाच प्रकारचे पर्याय आहेत.  मोसूलमध्ये राहिल्यास त्यांच्यावर ही संकटे कोसळणार आहेत. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना दहशतवादी गोळी घालून ठार करू लागले आहेत. युद्धात होरपळणारे ही सुमारे साडेतीन लाख मुले असून ती १८ वर्षांखालील आहेत. मोसूलमधील परिस्थिती भयंकर बनली आहे, असे लंडनस्थित एनजीआेने म्हटले आहे. 
 
चार महिन्यांपासून मोहीम  
मोसूलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी इराक व मित्रराष्ट्रांच्या फौजा लढत आहेत. परंतु अद्यापही पश्चिमेकडील भागावर पूर्ण विजय मिळवता आलेला नाही. सैनिकांना दहशतवाद्यांशी तोंड द्यावे लागत आहे. हा प्रदेश इस्लामिक स्टेटने २०१४ मध्ये खलिफा म्हणून जाहीर केले होते. २४ जानेवारी रोजी फौजांनी पूर्व मोसूलवर पूर्ण विजयाची घोषणा केली होती. त्याअगोदर १७ ऑक्टोबरला मोसूलवरील चढाईला सुरुवात झाली होती.  

खुष्कीचा मार्ग गरजेचा  
शहरात युद्धासारखी परिस्थिती असली तरी खुष्कीच्या मार्गाने निष्पाप मुले व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. खुष्कीचा हा मार्ग मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षेचा असला पाहिजे. त्याचबरोबर हा मार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे, अशी मागणी एनजीआेंनी केली आहे.  
 
अरुंद रस्त्यांचे आव्हान  
शहरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालये यांचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेत फौजांना दहशतवाद्यांवर कारवाई करावी लागत आहे. शहराची रचना अरुंद रस्त्यांनी बनलेली आहे. त्यावरून रणगाड्यांसह इतर लष्करी साहित्य नेणे कठीण झाले आहे. त्यामुळे धडक कारवाई करताना अधिक जागृत राहावे लागते. त्यामुळे खूप वेळ जात आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.  
 
दोन गावे ताब्यात  
इराकी फौजांनी वेस्ट बँक भागातील दोन गावांना ताब्यात घेतले आहे. सैन्याने या भागात दडलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. 
बातम्या आणखी आहेत...