आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततापूर्वक सत्ता सोपवू : यू थेनसेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांगून- म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू थेनसेन यांनी रविवारी सकारात्मक प्रतिसाद देताना या वेळी शांततापूर्वक सत्ता सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नोबेल विजेत्या आँग सान स्यू की यांच्या एनएलडी पक्षाला विजय मिळाल्यामुळे स्यू की यांच्याकडे सत्ता सोपवली जाणार आहे. ९० राजकीय पक्षांच्या बैठकीत सेन यांनी हे आश्वासन दिले.

१९९० च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनएलडीला ४८५ पैकी ३९२ जागी विजय मिळाला होता, परंतु तेव्हा लष्कराने लोकशाहीला नाकारून स्यू की यांना नजरबंद केले होते. त्यामुळे त्यांना सुमारे १५ वर्षे नजरबंद राहावे लागले होते. गेल्यावेळच्या निवडणुकीवर एनएलडीने बहिष्कार टाकला होता, परंतु पाेटनिवडणुकीत एनएलडीला ४५ पैकी ४३ जागी विजय मिळाला होता. थेनसेन म्हणाले, या वेळी निवडणूक पूर्णपणे लोकशाही मार्गाने झाली होती. जगभरातील नेत्यांकडून त्याचे कौतुक झाले होते. ही निवडणूक स्वतंत्र आणि नि:पक्षपणे पार पडल्याचे जागतिक निरीक्षकांनी स्पष्ट केले होते. थेनसेन (७०) लष्करशहा होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी लष्करप्रमुखपद सोडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता, परंतु आता देशाचा कारभार चालवण्याची जबाबदारी विजयी झालेल्या पक्षाची आहे आणि सरकारवर निगराणी ठेवण्याचे काम विरोधकांचे असते. दरम्यान, लष्करप्रमुखांनी आँग सान स्यू की यांच्यासोबत संपूर्ण सहकार्य करण्याची तयारीदेखील दर्शवली आहे.

आज अखेरचे सत्र
विद्यमान संसदेच्या अखेरच्या सत्राचे आयोजन सोमवारी करण्यात आले आहे. त्या अधिवेशनाला आँग सान स्यू की हजेरी लावतील. ही संसद जानेवारीपर्यंत हंगामी सरकार म्हणून काम करेल. जानेवारीत नवीन सरकार आणि संसद सदस्य पदभार घेतील.\\