आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nigerian Opposition Leader Buhari Wins The Presidency

नायजेरियात मोहंमदू बुहारी यांचा ऐतिहासिक विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुजा - आफ्रिका खंडातील लोकप्रिय देश असलेल्या नायजेरियात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहंमदू बुहारी यांचा विजय झाला. बुधवारी मतमोजणीनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बुहारी यांनी त्यांचे तुल्यबळ गुडलक जॉनाथन यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
पूर्वाश्रमीचे लष्करी विचारधारेचे बुहारी यांनी अलीकडे लोकशाही मूल्यांचा स्वीकार केला होता. जनतेने त्यांना पाठिंबा देत विजयी केले. बुहारी यांच्या विजयानंतर त्यांच्या हजारो समर्थकांनी कानो शहरात एकच जल्लोष केला. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. ‘सये बुहारी’ (फक्त बुहारी) अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. कानो हे देशाच्या उत्तरेकडील सर्वात मोठे शहर आहे. बुहारी यांना १५ लाख ४२ हजार मते पडली.
एकूण ५३ टक्के मते पडली. जॉनाथन यांना १२ लाख ८५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. दरम्यान, ७२ वर्षीय बुहारी यांनी १९८० च्या दशकात लष्करशहा म्हणून अल्पकाळ सत्ता गाजवली होती; परंतु नंतर त्यांनी लोकशाही मूल्यांचा स्वीकार करून राजकीय मार्ग बदलला होता. जॉनाथान यांच्या पक्षाने १६ वर्षे सत्ता उपभोगली नायजेरियात गेली १६ वर्षे जॉनाथन यांच्या पक्षाची सत्ता आहे. अखेर जनतेने देशात सत्तापालट घडवून आणले.

सहा वेळा लष्करशाही

नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाने सहा वेळा लष्करशाही पाहिली आहे. १९६० पासून देशावर लष्करशहा राज्य करत आले; परंतु जॉनाथन यांच्या पक्षाने नंतर ही परंपरा मोडली. ताज्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने राष्ट्राध्यक्षपदाची निवड झाली आहे. त्यानंतर बुहारी यांच्या विजयाची घटना ऐतिहासिक मानली जाते. जनतेचा कौल महत्त्वाचा ठरला.
चेंज.. चेंज..

देशाच्या उत्तरेकडील कडुना शहरात २०११च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दंगल उसळली होती. त्याच शहरात बुधवारी आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुहारी यांच्या ऑल प्रोग्रेसिव्ह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ‘चेंज.. चेंज..’ अशा घोषणा देत बुहारींचे समर्थन केले.
बोको हरमला धडा

नायजेरियात कट्टरवादी बोको हरम गटाने हल्ल्याची धमकी दिली होती. त्याचा परिणाम राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येईल, असे वाटले होते; परंतु नागरिकांनी बंडखोरांना न जुमानता आपला हक्क बजावला. बंडखोरांच्या धमक्यांची पर्वा न करता नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले होते. नागरिकांना विकास हवा आहे. त्यासाठी त्यांनी लोकशाहीवादी पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिल्याची भावना यातू दिसून आली.

लोकशाहीवर विश्वास असल्याचे सिद्ध झाले

^शांततामय मार्गाने मतदान करून बदल घडवून आणणाऱ्या देशांमध्ये आता नायजेरियाचा समावेश झाला आहे. मुक्त वातावरणात ही निवडणूक पार पडली. लोकशाहीवर विश्वास असल्याचे या विजयातून सिद्ध झाले आहे. माझ्यासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. -मोहंमदू बुहारी.