आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये नऊ वर्षांची मुलगी काढते वृत्तपत्र, घटनास्थळी जाऊन केले हत्या प्रकरणाचे वार्तांकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेनसिल्व्हेनिया (अमेरिका) - अमेरिकेच्या एका भागात एका व्यक्तीची हत्या झाली होती. या घटनेची माहिती मिळताच एक नऊ वर्षांची मुलगी तेथे वार्तांकन करायला पोहोचली. तिच्या हातात पेन, डायरी आणि कॅमेरा होता. तिने आसपासच्या लोकांशी चर्चा करून घटनेची माहिती मिळवली.

त्याच्या नोंदी डायरीत घेतल्या. तसेच त्या घटनेची छायाचित्रेही घेतली. एवढेच नव्हे तर तिने घटनेबाबत पोलिसांकडेही चौकशी केली. हे पाहून तेथे उपस्थित लोक चकित झाले. घरी पोहोचल्यानंतर तिने या घटनेची बातमी लिहिली आणि ती आपल्या वृत्तपत्रात प्रकाशितही केली. मुलीच्या या बहादुरीची जगभरातील माध्यमांनी स्तुती केली आहे.
ही लहानगी संपादक आहे हिल्दे केट लिस्याक. ती अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया प्रांतातील सेलनिसग्रोव्हची राहणारी आहे. ही घटना आहे २ एप्रिलची. ती घरी होती. त्या वेळी आपल्या भागात एका व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती तिला मिळाली. पोलिसांनी तिच्या घराजवळील रस्ते बंद केले होते. हे पाहिल्यानंतर ती त्वरित घराबाहेर निघाली.

मी पत्रकार आहे, असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ती घटनास्थळी पोहोचली. ज्या खोलीत या व्यक्तीची हत्या करण्यात आली तेथे ती गेली. पुन्हा घरी परत येऊन तिने पोलिस अधिकाऱ्यांकडून दूरध्वनीद्वारे घटनेची सविस्तर माहिती घेतली. तिने या घटनेचा छोटा व्हिडिओही तयार केला आहे. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिथे इतर पत्रकार नव्हते. हिल्दे किटने २०१४ मध्ये ऑरेंज स्ट्रीट न्यूजपेपर आणि वेबसाइट सुरू केली होती. तीच त्याची संपादक आणि प्रकाशक आहे. या घटनेचे छायाचित्र आणि बातमी तिनेच सर्वात आधी आपल्या सोशल मीडियाचे पेज आणि वेबसाइटवर दिली. तिचे वडील एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार होते. तिने त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी ती शिकली. त्या संस्कारातून तिला एवढ्या लहानपणी बातमीदारीचा प्रत्यक्ष अनुभव देखील घेता येऊ शकला. काही लोकांनी तिच्या वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा तिने त्यांना कडक शब्दांत उत्तर दिले, ‘होय, मी नऊ वर्षांची आहे, पण मी आधी पत्रकार आहे.
मी हे काम करू शकत नाही असे माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. मी हे काम करू शकते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नये. दोघेही समान आहेत.’ हिल्दे केट आता अमेरिकेत लोकप्रिय झाली आहे. जगभरातील मोठमोठी वृत्तपत्रे तिच्या मुलाखती घेत आहेत.