आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Hydrogen Bomb Test Site 5.1 Magnitude Earthquake Detected Close.

हायड्रोजन बॉम्ब टेस्ट: PAK ने केव्हा केली होती मदत, जाणून घ्या कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन 3 जानेवारीला हायड्रोजन बॉम्ब चाचणीला मंजरी देताना - Divya Marathi
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन 3 जानेवारीला हायड्रोजन बॉम्ब चाचणीला मंजरी देताना
सेऊल/ संयुक्त राष्ट्रे- उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला. त्यामुळे चाचणीस्थळाजवळ रिश्टर स्केलवर ५.१ तीव्रता भूकंप झाला.या चाचणीबरोबरच संपूर्ण जग हादरून गेले आहे.

या चाचणीनंतर जपान आणि दक्षिण कोरिया या उत्तर कोरियाच्या शेजारी राष्ट्रांनी आपल्या कॅबिनेट आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदांच्या तातडीच्या बैठका बोलावून सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. उत्तर कोरियाचा मित्र चीनसह जगभरातील नेत्यांनी या चाचणीवर तीव्र टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लादण्याबाबत विचार होऊ शकतो.

पाकिस्तानच्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली होती कोरियाला तांत्रिक मदत
- यूकेच्या एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार, 1990 ते 1998 दरम्यान उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथून दर महिन्याला दोन विमाने पाकिस्तानला येत होती.
- शास्त्रज्ञ ए.क्यू. खानने अण्वस्त्र विकसित करण्याचे तंत्रज्ञान उत्तर कोरियाला विकले होते.
- त्याच्यावर हा देखिल आरोप आहे की त्याने सेंट्रिफ्यूज इनरिचमेंट टेक्नॉलॉजी बेकायदेशिररित्या उत्तर कोरियाला दिली होती.
- याच टेक्नॉलॉजीचा उपयोग काही हायड्रोजन फॅसिलिटीजमध्ये देखिल होतो.
- नॉर्थ कोरियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 1998 मध्ये खानला एक पत्र पाठवले होते.
- त्यात पाकिस्तान लष्कराच्या एका माजी प्रमुखाला तीस लाख डॉलर दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
- खानने टीव्हीवर मान्य केले होते की त्याने तंत्रज्ञान विकले होते. मात्र त्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे खानने म्हटले होते.
- खानच्या या वक्तव्यानंतर तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी 2004 मध्ये त्याला माफ केले होते.
केव्हा झाली चाचणी
‘बुधवारी सकाळी १० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी वाजता) हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आता आम्ही कोणत्याही अण्वस्त्रसज्ज देशांच्या बरोबरीत आलो आहोत,’ असे उत्तर कोरियाच्या सरकारी दूरचित्रवाणीने जाहीर केले. उत्तर कोरियाने घेतलेली ही चौथी अणु चाचणी आहे. मात्र हायड्रोजन बॉम्बची पहिलीच चाचणी आहे. पुंगिया री या उत्तर कोरियाच्या चाचणीस्थळापासून ४९ किलो मीटर अंतरावर ही चाचणी घेण्यात आली आहे.

जपानचे संरक्षणमंत्री पळतच पंतप्रधानांकडे पोहोचले :
उत्तर कोरियाने चाचणी केल्याचे कळताच जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी तीव्र टीका करत कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलावली. संरक्षणमंत्री जनरल नाकातानी हे पळतच या बैठकीसाठी पंतप्रधानांकडे पोहोचले. त्यांच्यासोबत अनेक पत्रकारही पळताना दिसून आले. उत्तर कोरियाची ही चाचणी जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे अॅबे यांनी म्हटले आहे.

वातावरणातील चाचणीवर १९६३ पासून निर्बंध :
सन १९६३ मध्ये एकूण चारपैकी तीन अणुशक्तींनी (ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत संघ)मर्यादित चाचणीबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानुसार हवा, पाणी किंवा अंतराळात कोणत्याही प्रकारची अणुचाचणी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या करारात फक्त भूमिगत अणुचाचणीलाच परवानगी होती. फ्रान्सने १९७४ पर्यंत आणि चीनने १९८० पर्यंत हा करार मान्य केला नव्हता. भारताने १९७४ १९९८ आणि पाकिस्तानने १९९८ मध्ये भूमिगत अणुचाचण्या घेतल्या होत्या. अमेरिकेने १९९२, सोव्हियत संघाने १९९०, ब्रिटनने १९९१ पर्यंत भूमिगत चाचण्या घेतल्या.

उत्तर कोरियाचे आवाहन :
जोपर्यंत अमेरिकेचे आक्रमक धोरण कायम राहील तोपर्यंत आम्ही अणु कार्यक्रम भक्कम करणे सुरुच ठेवू. आम्ही एक जबाबदार अणुशक्तीच्या रुपातच वागू. अणुशक्तीचा वापर आम्ही आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठीच वापरू. आम्ही आमची अणु क्षमता अन्य कोणत्याही देशांना देणार नाही.

- चाचणीनंतर उत्तर कोरियाने जारी केलेले निवेदन

चीनचा विरोध :
चीन या चाचणीचा विरोध करते. चाचणीपूर्वी उत्तर कोरियाने आम्हाला माहिती दिली नाही. कोरिया द्विप अण्वस्त्रमुक्त करण्याचे चीनचे प्रयत्न सुरुच राहतील. उत्तर कोरियानेही आपले आश्वासन पाळावे.
- हुआ चुनयिंग, चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते.

आणि भारताला चिंता :
‘आम्ही अशा बातम्या पाहिल्या आहेत. आम्ही त्याचे आकलन करत आहोत. आम्ही आधीच आमचे शेजारी आणि पूर्वोत्तर आशिया दरम्यानच्या अणु संपर्काबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रदेशातील शांतता स्थैर्य धोक्यात येईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही उत्तर कोरियाला आवाहन करतो.’
- विकास स्वरुप, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

हायड्रोजन बॉम्बची पहिली चाचणी अमेरिकेने १९५२ मध्ये अॅनव्हेटॉकमध्ये घेतली होती. त्यानंतर वर्षभरानेच तत्कालीन सोव्हिएत युनियनने त्याची यशस्वी चाचणी केली होती. त्यानंतर चीन, ब्रिटन, फ्रान्सनेही हायड्रोजन बॉम्ब विकसित केले आहेत.

उत्तर कोरियाच्या अणुचाचण्या
वर्ष भूकंप तीव्रता

ऑक्टोबर २००६ ४.३
मे २००९ ४.७
फेब्रुवारी २०१३ ५.१
जानेवारी २०१६ ५.१

१५ डिसेंबरलाच मंजुरी, किमला ‘बर्थडे गिफ्ट’
उत्तरकोरियाच्या शास्त्रज्ञांनी हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीच्या स्वरूपात हुकूमशहा किम जोंग उन यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. जानेवारीला त्यांचा वाढदिवस आहे. उन यांनी १५ डिसेंबर रोजीच या चाचणीच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली होती. ‘२०१६ या वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली पाहिजे. आमच्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा रोमांचक आवाज जगाला ऐकू गेला पाहिजे. म्हणजे संपूर्ण जगाने आमचे समाजवादी अण्वस्त्रसज्ज संघराज्य आणि महान कोरियन वर्कर्स पार्टीने पाहिले पाहिजे,’ असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते.

काही मिनिटांतच अनेक शहरे उडवून देण्यास सक्षम
हायड्रोजन बॉम्बला थर्मो न्यूक्लिअर डिव्हाइसही म्हणतात. तो जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर १९४५ मध्ये टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही लाखपट घातक आहे. या बॉम्बच्या स्फोटाने तापमान वीस लाख अंशांवर वाढते. त्याच्या संपर्कात येणाऱ्या कशाचीही काही मिनिटांतच वाफ करून उडवून देऊ शकतो. हे बॉम्ब एवढे लहानही असू शकतात की ते कोणत्याही विमानातून टाकले जाऊ शकतात.

क्षमतेवर अमेरिकेची शंका
व्हाइटहाऊसने उत्तर कोरियाच्या चाचणी क्षमतेवरच शंका घेतली आहे. मात्र दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क गुन यांनी आपल्या लष्कराला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तेथे तैनात अमेरिकी सैनिकांनाही सतर्क करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा व्हिडिओ...