आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांत वाढ, पुढील वर्षी दुप्पट! धोक्याबाबत अमेरिकेतही विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरिया वेगवान पद्धतीने अण्वस्त्रनिर्मिती करत असल्याचा इशारा चीनने दिला आहे. सध्या त्यांच्याकडे २० अण्वस्त्रे असून पुढील वर्षी ही संख्या दुप्पट होईल. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अणुतज्ज्ञ यामुळे चिंतित असून संभाव्य धोका परतावून लावण्यावर बंद खोलीत विचारविनिमय केला जात आहे.

वॉलस्ट्रीट जर्नलने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात अमेरिकी तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर कोरियाकडे जवळपास १० ते १६ अण्वस्त्रे असतील, असा अमेरिकेचा अंदाज आहे. उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमाचे तज्ज्ञ सिगफ्रीड हॅकर म्हणाले, ताज्या आकडेवारीतून जगभराच्या चिंतेत दुप्पट वाढ झाली आहे. हॅकर अमेरिकी तज्ज्ञांच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीस उपस्थित होते. चीनने केलेल्या विश्लेषणात उत्तर कोरियाच्या वाढत्या अणु कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकी अहवालातही उत्तर कोरिया वेगाने अण्वस्त्र कार्यक्रम राबवत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार, त्यांच्याकडे २०२० पर्यंत जवळपास १०० अणुबॉम्ब असतील, असे सांगण्यात येते.

तीन वेळा अणू चाचणी
उत्तर कोरियाने २००६, २००९ आणि २०१३ मध्ये अणुचाचणी केली होती. त्यांनी आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचीही यशस्वी चाचणी केली आहे. २०१२ मध्ये त्यांनी पृथ्वीच्या कक्षेत रॉकेटद्वारे उपग्रह सोडण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. दक्षिण कोरियानेही जानेवारीत श्वेतपत्रिका जारी करून उत्तर कोरियाच्या क्षमतेची आेळख करून दिली होती.

इराणवर पुन्हा वाढला दबाव
वृत्तसंस्था | व्हिएन्ना
इराण आणि जगातील महासत्तांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत. इराण अणु कराराने अद्याप निर्णायक टप्पा न गाठल्याने दबाव वाढत आहे. इराण, मित्रराष्ट्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रतिनिधी यांची व्हिएन्ना येथे बैठक सुरू आहे. ३० जूनपर्यंत या करारावर सहमती होणे अपेक्षित आहे. इराण अणु प्रकल्प केवळ विकासात्मक कामांसाठी असावेत, त्यावर संयुक्त राष्ट्रांचे थेट नियंत्रण असावे, अशी भूमिका मित्रराष्ट्रांची आहे. हा करार दशकभरासाठी लागू करण्यात येईल. या बैठकीदरम्यान इराण उच्चाधिकाऱ्यांवरील दबाव वाढवण्यात आला आहे.

येमेनला सैन्य पाठवण्यास नकार
वृत्तसंस्था |इस्लामाबाद

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उच्चाधिकाऱ्यांच्या ताफ्यासह सौदी अरबला रवाना झाले. येमेनमधील स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सैन्य पाठवणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतल्यानंतर आखाती राज्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हाउती बंडखोरांशी मुकाबला करण्यासाठी पाकने सैन्य पाठवावे, अशी मागणी सौदी अरबकडून करण्यात आली होती. पाक प्रतिनिधीगृहाने याविरुद्ध भूमिका घेतली. येमेन प्रश्नावर पाकने तटस्थ राहण्याचा निर्णय येथील संसदेने दिला. यामुळे उभय राष्ट्रांच्या संबंधात कटुता आली आहे. ही कटुता दूर करण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ, संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ, लष्कर प्रमुख राहील शरीफ, परराष्ट्र सचिव तारिक फातेमी सौदीला रवाना झाले आहेत.