आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र लाँच ; नंतर काही क्षणांतच जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - उत्तर कोरियाने रविवारी क्षेपणास्त्र चाचणीचा प्रयत्न केला, परंतु क्षेपणास्त्र लाँच करण्यात आल्यानंतर काही क्षणांतच ते जळून खाक झाले, असा दावा अमेरिकेने केला आहे. हुकूमशहा किम जाँग उन यांच्या आजोबांच्या जयंतीदिनी शक्तिप्रदर्शन केल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आली आहे.  
 
कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीचा धडाका लावलेला असला तरी रविवारची चाचणी अयशस्वी ठरली आहे. हे क्षेपणास्त्र नेमके कोणत्या प्रकारातील होते. हे मात्र समजू शकलेले नाही, असे अमेरिकेच्या प्रशांत सागर क्षेत्र विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या विभागाने क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे. सिनपोजवळ ही चाचणी घेण्यात येत होती; परंतु उड्डाणानंतर काही क्षणांतच त्याने पेट घेतला, असे पॅसिफिक कमांडचे प्रवक्ते डेव्ह बेनहॅम यांनी सांगितले.  
 
सिनपो हे बंदराचे शहर आहे. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडे हे शहर असून याच महिन्याच्या सुरुवातीलादेखील तेथे क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्येही कोरियाच्या संरक्षण विभागाला अपयश आले होते. दक्षिण कोरिया व जपानच्या मदतीने अमेरिकेचा हा विभाग उत्तर कोरियाच्या हालचालींवर बारकाईने देखरेख ठेवण्याचे काम करतो.  

ट्रम्प यांना पूर्ण कल्पना  उत्तर कोरियाचा लाँचिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. परंतु ट्रम्प यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेले नाही, असे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी सांगितले.  
 
पेन्स सेऊलमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. ते सेऊलमध्ये असतानाच उत्तर कोरियाच्या चाचणीच्या प्रयत्नाची माहिती समोर आली. उत्तर कोरियाच्या अणुविषयक महत्त्वाकांक्षेला मुरड कशी घालायची, यावर चर्चा करण्यासाठी पेन्स दक्षिण कोरियाच्या भेटीवर आहेत. उत्तर कोरियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने तयारी केली आहे. ब्रिटननेही अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर कोरिया संपूर्ण जगासाठी धोका : दक्षिण कोरिया
क्षेपणास्त्र चाचणी घेण्याची कृती संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे, असा इशारा दक्षिण कोरियाने दिला आहे. त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही लांब पल्ल्याच्या अण्वस्त्र चाचणीवरून गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दक्षिण कोरियाने दिला.
बातम्या आणखी आहेत...