आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Nuclear Test: A Cancer That Spread From Pakistan

उत्तर कोरियाला मदत: हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीने पाकिस्तानचे पितळ उघडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- उत्तर कोरियाने घेतलेल्या पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीने जग हादरले असले तरी याबाबत इशारा देणारी चर्चा महिनाभरापूर्वीच अमेरिकी सभागृहात झाली होती. उत्तर कोरियासारख्या आक्रमक राष्ट्राशी पाकच्या आण्विक संबंधांबाबत अमेरिकी खासदार व तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. उत्तर कोरियाने घेतलेल्या या चाचणीमुळे पाकची अण्वस्त्रप्रसाराची मानसिकता स्पष्ट झाले आहे.

पाकशी नागरी आण्विक करार करण्यासंबंधी चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी पाकच्या मानसिकतेवर अचूक बोट ठेवून या देशाचे उ. कोरियासारख्या आक्रमक राष्ट्राशी असलेले संबंध उघड केले होते. एवढेच नव्हे, संवेदनशील आण्विक तंत्रज्ञान पाकने लिबिया व उ. कोरियाला पुरवल्याचा आरोपही त्या वेळी करण्यात आला होता.

उत्तर कोरियासह लिबियाला विकली आण्विक गुपिते
खान कर्ते-करविते : पाक अणुशास्त्रज्ञ अ. क्यू. खान यांनीच उ. कोरियात अणुबॉम्ब निर्मिती प्रकल्प उभारणीला मदत केल्याचे मतही अमेरिकी खासदारांनी व्यक्त केले होते. याच काळात लिबियालाही काही गुपिते खान यांनी विकल्याचा आरोपही काँग्रेस सदस्य टेड पो यांनी केला होता.
अण्वस्त्रप्रसार हाच इतिहास : अण्वस्त्रांचा प्रसार हाच पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे. अण्वस्त्रांशी संबंधित काही उपकरणे व तंत्रज्ञान इराणला विकून खान यांनी याची सुरुवात केली होती. नंतर लिबिया व उत्तर कोरियालाही असेच तंत्रज्ञान त्यांनी विकले.

तणाव वाढणार
उ. कोरियाच्या चाचणीनंतर अमेरिका काय भूमिका घेते याकडे जगाचे लक्ष आहे. आगामी काळात अण्वस्त्रसज्ज अमेरिकी पाणबुड्या कोरियानजीक दाखल होण्याची शक्यता असून यामुळे आशियामध्ये तणाव वाढणार आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकी युद्धनौका व पाणबुड्या तैनात करण्यास परवानगी दिली.

जपानच्या सुरक्षेची हमी
हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर हादरलेल्या जपानला अमेरिकेने सुरक्षेची सर्वतोपरी हमी दिली. जागतिक पातळीवर याचा निषेध केला जावा व सर्व देशांनी याबाबत उत्तर कोरियावर दबाव वाढवावा म्हणून अमेरिका-जपान एकत्र आले आहेत. पंतप्रधान अॅबे यांनी अगोदरच ही चाचणी राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे म्हटले होते.

अमेरिका, जपान, कोरिया एकत्र
वॉशिंग्टन- उ. कोरियाविरुद्ध पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया एकत्र आले आहेत. याबाबत अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या देशांच्या नेत्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

नव्या निर्बंधांचा इशारा
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षाविषयक परिषदेने गुरुवारी उ. कोरियावर नव्याने कठोर निर्बंध लादले जातील, असा इशारा दिला. चीनसह १५ देश सदस्य असलेल्या या सुरक्षा परिषदेने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले.