आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाची मुजोरी कायम, पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी करणार; दक्षिण कोरियाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तर कोरिया नव्या क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला आहे. या स्थितीत अमेरिकेच्या सहकार्याने आपण द. कोरियाची बचाव प्रणाली वाढवणार असल्याचे राजधानी सेऊलमधून सांगण्यात आले. प्याँगयांगने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतल्यानंतर आता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स(थाड) सिस्टिम वाढवण्याचे सेऊलने घोषित केले. यामुळे चीन संतप्त झाला असल्याचेही येथील संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणी स्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यास द. कोरिया सज्ज असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. सोमवारी पहाटे द. कोरियाने कमी अंतरावर मारा करणाऱ्या ह्यूनमो क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. द. कोरियाच्या पूर्व किनाऱ्याहून ही चाचणी घेण्यात आली. प्याँगयांगने रविवारी घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या क्षमतेची माहिती दिली आहे. क्षेपणास्त्रात हा बॉम्ब सहज फिट होऊ शकतो, असा दावा उत्तर कोरियाने केला आहे.

जुलैमध्ये उत्तर कोरियाने दोनदा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यानंतर हा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का आहे. अमेरिकेचे युद्ध स्थानक असलेल्या गुआमला बेचिराख करण्याची धमकीही किम जोंग उन यांनी दिली आहे.  

आंतरखंडीय क्षेपणास्त्राद्वारे अण्वस्त्र हल्ला करण्यास उत्तर कोरिया सज्ज   
रविवारी घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बची क्षमता पूर्वीच्या अण्वस्त्रांच्या तुलनेत ५ पट असल्याची माहिती द. कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. उत्तर कोरियाची अण्वस्त्रसज्जता यावरून दिसून येते. आंतरखंडीय क्षेपणास्त्राद्वारे अणुबॉम्ब हल्ला करण्यास हा देश सज्ज झाला आहे. हायड्रोजन बॉम्बचा आकारही अत्यंत छोटा होता, असे द. कोरियाचे संरक्षणमंत्री साँग याँग मो यांनी म्हटले आहे. दरम्यान, द. कोरियाने स्वसंरक्षणार्थ अमेरिकेची मदत मागितली आहे. अमेरिकेकडून अण्वस्त्र मागितल्याची बातमी खोटी असल्याचे द. कोरियाने म्हटले आहे. रविवारच्या चाचणीनंतर उत्तर कोरिया पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी घेणार असल्याचे द. कोरियाने म्हटले आहे. या वेळी प्रशांत सागरातच याचे लक्ष्य असेल.  

किरणोत्सर्जन झाले नाही, जपान आणि चीनचा निर्वाळा  
जपान आणि चीनच्या सूत्रांनी म्हटले आहे की, उत्तर कोरियाने रविवारी घेतलेल्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर कोणतेही किरणोत्सर्जन झाल्याचे पुरावे नाहीत. भूगर्भात ही चाचणी घेण्यात आली. जपानच्या वरिष्ठ सरकारी प्रवक्त्या योशिहिदे सुगा यांनी सांगितले की, किरणोत्सर्जन तपासणी केल्यानंतर स्थिती पूर्ववत आढळून आली. वायूचे नमुने सामान्य निघाले. कोरिया सीमेजवळ चीनच्या पर्यावरण मंत्रालयाने वायुचाचणी घेतली. वातावरणातही किरणोत्सर्जन आढळले नाही. स्फोटाची तीव्रता ४.६ मॅग्निट्यूड होती.

उत्तर कोरियावर अंकुश ठेवण्यात अपयश  
आंतरराष्ट्रीय समुदायाला उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिका, जपान, द. कोरियाचे अनुमान चुकत असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले. २ दशकांपासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश ,बराक आेबामा तसेच जपान आणि द. कोरियाच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांचे अंदाज चुकत गेले. त्यामुळे अाशियात हा अण्वस्त्र भस्मासुर उदयाला आला असल्याचे अमेरिकेच्या द आर्म्स कंट्रोल असोसिएशनने म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...