आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने केली पाचवी अणुचाचणी; 5.3 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे मिळाली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तर कोरियाने शुक्रवारी आपली पाचवी आणि सर्वात शक्तिशाली अणु चाचणी केली. चाचणीची माहिती कोणालाही नव्हती, पण या भागात भूकंपासारखे धक्के जाणवल्यानंतर दक्षिण कोरियाने अणु चाचणी केल्याची शंका वर्तवली होती. उत्तर कोरियानेही अनेक तासांनंतर चाचणीला दुजोरा देताना आता आमचा देश बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्राद्वारे अणुबॉम्ब घेऊन जाण्यास सक्षम झाला आहे, असे सांगितले.

अमेरिका, युरोप आणि चीनच्या संस्थांनी आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता धक्के जाणवल्याची माहिती दिली. रिश्टरवर भूकंपाची तीव्रता ५.३ एवढी नोंदली गेली, असे या संस्थांनी सांगितले. उत्तर कोरियाने या वर्षी जानेवारीमध्ये चौथी अणुचाचणी केली होती. यापूर्वीही त्या देशाने २००६, २००९ आणि २०१३ मध्ये अणुचाचणी केली होती.

आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाच्या विरोधात : चाचणीनंतरसंपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाच्या विरोधात एकजूट झाला आहे. चीन, फ्रान्स, जपान आणि अमेरिकेने चाचणीला तीव्र विरोध दर्शवला. हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील आव्हान आहे, अशी टिप्पणी सर्वांनी केली.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष पार्क ग्यून म्हणाल्या की, उत्तर कोरियावर आणखी कडक निर्बंध लादण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्याबद्दल पार्क म्हणाल्या की, आपल्या सणकी स्वभावामुळे ते आपल्या बरबादीला निमंत्रण देत आहेत. दुसरीकडे, चीनने उत्तर कोरियाच्या विरोधात राजनयिक विरोध करू, असे म्हटले आहे. अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्री डॅनियल रसेल म्हणाले की, उत्तर कोरियावर दबाव टाकण्यासाठी आम्ही जपान, चीन, रशिया आणि दक्षिण कोरियाशी चर्चा करत आहोत.

हिरोशिमावर पडलेल्या बॉम्बपेक्षा जास्त शक्तिशाली
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने म्हटले आहे की, आम्ही या अणुचाचणीची चौकशी करू. ज्या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली आहे, तो हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा जास्त शक्तिशाली आहे.

ओबामांचा इशारा : गंभीर परिणाम भोगावे लागतील
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी उत्तर कोरियाची अणुचाचणी म्हणजे चिथावणी करण्याची कारवाई असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाला याचे गंभीर परिणाम भोगाव लागू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना आश्वस्त करताना ओबामा म्हणाले की, अमेरिका, आशियासह जगातील इतर भागांत आमच्या सहयोगी देशांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. परस्पर संरक्षण करारानुसार उत्तर कोरियापासून असलेल्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी शक्य ती कारवाई करू.
बातम्या आणखी आहेत...