सेऊल - नॉर्थ कोरियाचे उपपंतप्रधान चोई योंग-गोन यांना हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर टीका केल्याच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. साऊथ कोरियाच्या योनहाप न्यूज एजंसीच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. हुकूमशहा उन यांच्या धोरणांचा खुलेपणाने विरोध केल्याने चोई यांना फायरिंग स्क्वॉडने गोळ्या घातल्या. चोई यांना ही शिक्षा मे महिन्यातच देण्यात आली. पण त्याची बातमी आता समोर आली आहे.
जून, 2014 मध्ये बनले होते उपपंतप्रधान
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चोई यांना जून 2014 मध्ये उपपंतप्रधान बनवण्यात आले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून नॉर्थ कोरियाच्या स्टेट मीडियानेही चोई यांच्याबाबत माहिती देणे बंद केले होते. एका वर्षात नॉर्थ कोरिया सरकारमध्ये मोठ्या नेत्याच्या मृत्यूची ही दुसरी बातमी समोर आली आहे. या पूर्वी नॉर्थ कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन होंग-चोल यांनाही हुकूमशहा यांचा आदर न राखल्याच्या आरोपात अँटी एअरक्राफ्टसमोर शूट करण्यात आले होते.
आत्याच्या नवऱ्याचीही हत्या
दोन वर्षांपूर्वी हुकूमशहा किम जोंग उन यांनी त्याचे काका जेंग सोंग थाएक यांचीही हत्या केली होती. थाएक यांच्यावर भ्रष्टाचार, व्याभिचार आणि देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले होते. अनेक वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 67 वर्षांच्या थाएक यांना 120 शिकारी कुत्र्यांच्या पिंजऱ्यात टाकून त्यांची हत्या करण्यात आली होती. थाएक यांची पत्नी ही उन यांची आत्या आहे. नॉर्थ कोरियामध्ये सरकारममध्येही महत्त्वाच्या पदावरही होते.