सेऊल - कोरियन उपखंडात यदाकदाचित यानंतर युद्ध लादले गेले, तर एकही अमेरिकी वाचणार नाही, अशा शब्दांत उत्तर कोरियातील नेत्यांनी अमेरिकेला धमकावले आहे. कोरिया युद्धाला ६२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित भव्य समारंभात अमेरिकेला ही धमकी देण्यात आली. यानिमित्त राजधानी प्योंगयांग व इतर शहरे सजवण्यात आली होती.
किम जोंगची धमकी
देशाच्या आण्विक शक्तीचा उल्लेख करून हुकूमशहा किम म्हणाले, ‘आण्विक अस्त्रांची भीती दाखवून आम्हाला धमकावण्याचे दिवस आता संपले आहेत. आता अमेरिकेची पतच राहिलेली नाही. आता आम्ही त्यांच्यासाठी मोठा धोका ठरलो आहोत.’ किम जोंग यांनी रविवारी मध्यरात्री कुमसुसान पॅलेसला भेट दिली. या ठिकाणी किम जोंग यांचे वडील किम जोंग इल आिण आजोबा किम इल संग यांचे पार्थिव सजवून सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
स्वाक्षरी करायलाही कोणी राहणार नाही...
उ. कोरियाच्या पीपल्स आर्मीचे प्रमुख आणि संरक्षणमंत्री जनरल पाक योंग सिक यांनी तर जोंग यांच्यापेक्षाही कडक शब्दांत अमेरिकेला इशारा दिला. ते म्हणाले, ‘आमच्याविरुद्ध कट-कारस्थाने करण्याची आणि इतर देशांना भडकावण्याची एकही संधी अमेरिका सोडत नाही. मात्र, अमेरिकेने हे लक्षात घ्यावे. आता उत्तर कोरिया दुबळा राहिलेला नाही. आता युद्ध झाले तर शरणागती पत्करल्यानंतर त्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या करण्यासाठी पण कोणी शिल्लक राहणार नाही.’
आता अण्वस्त्रसज्जता
एका अमेरिकी संशोधन गटाने दिलेल्या अहवालानुसार, उत्तर कोरिया योंगयोन येथील मुख्य आण्विक प्रकल्पात अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची तयारी करत आहे. वैशिष्ट्य म्हणजे उत्तर कोरियाचे लष्कर जगात सर्वात मोठे आहे. यात ९५ लाख सैनिक असून ही संख्या देशातील लोकसंख्येच्या ४० टक्के आहे.
अमेरिकेला शांतता नको आहे...
आम्ही गेल्या साठ वर्षांपासून शांत अाहोत. अमेरिकेला ही शांतता नको आहे. गेल्या वेळी युद्धात अमेरिकेचा पराभव अटळ होता. आता दुस-यांदा युद्ध झाले, तर अमेरिका संपून जाईल.
जनरल पाक योंग सिक, संरक्षणमंत्री
तीन वर्षे चालले होते युद्ध
तीन वर्षे चाललेले कोरियन युद्ध थांबवण्यासाठी २७ जुलै १९५३ रोजी करार झाला होता. मात्र, या दिवशी अशा कोणत्याही शांतता करारावर स्वाक्ष-या झाल्या नव्हत्या. उत्तर कोरिया मात्र या युद्धातील हा आपला विजय मानतो. अमेरिका या युद्धात संयुक्त राष्ट्रसंघातील काही देशांच्या मदतीने दक्षिण कोरियाच्या बाजूने लढला होता. हाच दिवस विजय दिवस म्हणून उत्तर कोरियामध्ये साजरा केला जातो.