आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळला आता पुराचा धोका, दरडी कोसळून नदीचा प्रवाह तुंबला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्कर विजेती हॉलीवूड अभिनेत्री सुझान सारांडन येथे असून ती पर्यटकांना नेपाळला भेट देण्याचे आवाहन करत आहे. - Divya Marathi
ऑस्कर विजेती हॉलीवूड अभिनेत्री सुझान सारांडन येथे असून ती पर्यटकांना नेपाळला भेट देण्याचे आवाहन करत आहे.
काठमांडू - नेपाळला संकटांनी घेरल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. भूकंपाचा तडाखा ताजा असतानाच आता देशाच्या पश्चिमेकडील भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. जमीन खचल्याने दरडी कोसळल्या त्यातून नदीचा प्रवाह तुंबल्यानेही पुराचा इशारा देण्यात आला आहे.

म्यागडी जिल्ह्यातील काली गंडकी नदीचा मार्ग दरडी आणि मातीमुळे बंद झाला आहे. राजधानीपासून वायव्येला १४० किलो अंतरावर अनेक ठिकाणी जमीन खचली. शनिवारी रात्रीपासूनच दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काली गंडकी ही नदी नेपाळच्या माध्यावरून उगम पावते आणि उत्तर भारतापर्यंत ती वाहते. याच भागात असलेल्या धरणातील पाण्याची पातळी १५० मीटरने वाढल्याचे नेपाळ पोलिसांनी ट्विटर अकाउंटवरून स्पष्ट केले आहे.

सायंकाळपर्यंत प्रदेशात कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही. परंतु प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जेणेकरून जीवितहानी टाळता येऊ शकेल. बेनी बाझार भागातील रहिवाशांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बेनी बाझार हे शहर धरणाच्या खालच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे पाणी कोणत्याही क्षणी नागरी वस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेपाळच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर हा इशारा जारी करण्यात आला आहे.

हजारो बेघर
पुराचा धोका असल्याने प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यानंतर रविवारपर्यंत हजारो नागरिकांनी राहती घरदारे सोडली.

लष्कर तैनात
धरण क्षेत्र आणि नदीच्या किनाऱ्यावरील गावांना धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने सर्व खबरदारी घेतली आहे. संकट आेढवण्यापूर्वीच प्रदेशात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. जेणेकरून संकटात लष्कर नागरिकांना तातडीने मदत करू शकेल.

नदीच्या खालच्या भागात ७ जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट ’
काली गंडकी नदीच्या खालच्या भागात असलेल्या अनेक गावांनादेखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. स्यांगजा, पर्बत, म्यागदी, बागलुंग, गुल्मी, पाल्पा, नवलपारसी जिल्ह्यांना पुराची भीती आहे.

भूकंपानंतरचे परिणाम
सामान्यपणे मुसळधार पावसानंतर जमीन खचणे, दरडी कोसळ्याचे प्रकार घडतात. परंतु नेपाळमध्ये भूकंपानंतर जमिनीला अनेक भागात भेगा पडल्या आहेत. त्यात ढिगारे कोसळू लागले आहेत. त्याशिवाय खडक, दलदलीत भाग, शिळा कोसळण्याचे मोठा आवाजही होऊ लागले आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तीन सौम्य धक्के
२५ एप्रिलच्या भूकंपानंतर नेपाळला वारंवार भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. रविवारी काठमांडू आणि परिसराने तीन सौम्य धक्के अनुभवले. यापैकी एकाची ४.२ तर दुसऱ्याची ४.४ रिश्टर एवढी त्याची तीव्रता होती. आता नेपाळमधील मृतांची एकूण संख्या ९ हजारांवर तर जखमी २१ हजार ८४५ झाले आहेत. २५ एप्रिलनंतर देशाला २६० धक्के बसले आहेत.

मनीषा कोईरालाचा पीडितांना मदतीचा हात : बाॅलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने मायदेशातील नैसर्गिक संकटातील पीडितांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधी कार्यक्रम (यूएनएफपीए) अंतर्गत महिलांना मदतीचा हात दिला.मनीषा कोईराला संयुक्त राष्ट्राच्या यूएनएफपीएची गूडविल अॅम्बेसेडर आहे. विभागाच्या वतीने शनिवारी ‘डिग्निटी फर्स्ट ’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात महिलांना डिग्निटी किट्सचे वितरण करण्यात आले. नैसर्गिक संकटाच्या काळात महिला-मुलींना चांगली वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यात महिलांच्या आरोग्यापासून दैनंदिन गरजांचाही समावेश आहे. आणीबाणीच्या काळात महिलांना मिळणारी वागणूक आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, असे मनीषाने म्हटले आहे. या प्रकल्पानुसार सुमारे १ लाख ६५ हजार महिला,मुलींना जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डिग्निट किटमध्ये टॉवेल, शॉल, टॉर्च, टूथपेस्ट, टूथब्रश अशा गरजेच्या वस्तू पुरवण्यात आल्यात आहेत.
बातम्या आणखी आहेत...