आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now There Is Sweat Test Of Taxi Drivers In Indonesia

टॅक्सीचालकांसाठी घामाची चाचणी, मोबाइल अॅपवर स्मेल रेट बघून बुकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियाच्या एका बाइक टॅक्सी कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. ‘नॉट सो स्मेली ड्रायव्हर’ अशी ही योजना आहे. चाचणी पूर्ण करणाऱ्यांनाच परवाना मिळणार आहे. स्मेल रेट पाहून टॅक्सीला बुक करता येऊ शकते. प्रवासादरम्यान चालकांच्या घामाच्या दुर्गंधीमुळे अनेक जण त्रस्त असतात; परंतु या सुविधेमुळे त्रस्त प्रवाशांना दिलासा मिळेल.

वाहनचालकांचा आढावा घेतल्यानंतर त्यात काही आढळून आल्यास त्याला इशारा देऊन निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यात सुधारणा न झाल्यास अशा चालकाला नाेकरीवरून कायमस्वरूपी काढून टाकले जाईल. न्यूवेस्ट मोटारसायकल शेअरिंग कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. एरिस वाहयुदी हे या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी मित्र आणि कुटुंबीयांकडून उसने पैसे घेऊन उबेरझेक कंपनीची स्थापना केली होती. कंपनीकडे तीन हजारांहून अधिक टॅक्सीचालक आहेत. वाहयुदी म्हणाले, आम्ही ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू केली आहे. चालक पार्किंगमध्ये येताच सर्वात अगोदर त्याला घाम सुकवावा लागतो. त्यानंतर त्याच्या बगलेतील घामाची टेस्ट घेतली जाते. ही चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याची सेवा ग्राहकांसाठी बुक केली जाते.

इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २५ कोटी आहे. देेशात लोक मोठ्या संख्येने सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करतात. देशात बाइक-टॅक्सी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अंतर्गत स्पर्धेतून टॅक्सी अॅप कंपन्यांनी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. इंडोनेशियात सध्या सुमारे ४० बाइक टॅक्सी कंपन्या आहेत.

गो-जेकने बाइक टॅक्सीसाठी स्मार्ट फोन अॅप तयार केले आहे. त्याद्वारे कोणत्याही बाइक लोकेशनला टॅप केले जाते. ग्राहक अहमद म्हणाले, सामान्यपणे मी बाइक टॅक्सीचा वापर करतो. चालकांच्या घामाचा वास असहनीय होतो. म्हणूनच नवीन पद्धत खरोखरच चांगली आहे.
गोवा, गुडगावमध्ये बाइक टॅक्सी
भारतात सर्वात अगोदर गोव्यात बाइक टॅक्सीला सुरुवात झाली होती. गेल्या महिन्यात बाइक टॅक्सी हरियाणाच्या गुडगाव शहरातदेखील चालू झाली आहे. त्याचे संस्थापक शहरातील एक स्टार्टअप उद्योजक अरुणाभ मधुर आहेत. या टॅक्सीचे नाव एम-टॅक्सी आहे. ही टॅक्सी पहिल्या तीन किलोमीटरसाठी २५ रुपये घेते. त्यानंतर एक किमीसाठी ५ रुपये द्यावे लागतात. सुरुवात १० बाइकने झाली आहे.