आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाप्रकरणी आेबामा, क्लिंटन, बुश ठरले अपयशी; ट्रम्प यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरिया धोरणाविषयी माजी राष्ट्राध्यक्ष अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. बराक आेबामा, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश हे उ. कोरियाविषयी खंबीर भूमिका घेऊ शकले नाहीत. मात्र, मी तसे करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलर्सन हे उ. कोरियाशी चर्चा करून व्यर्थ वेळ घालवत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांचा उल्लेख करत ट्विट केले, ‘रेक्स टिलर्सन लिटिल रॉकेटमनशी चर्चा करण्याचे व्यर्थ प्रयत्न करत असल्याचे मी त्यांना सांगितले आहे.’ त्यांनी म्हटले, आपली ऊर्जा रेक्स यांनी वाचवावी. आवश्यक ते सगळे उपाय योजण्यास अमेरिका सक्षम आहे.  
 
किम यांच्याशी सौहार्दपूर्ण राहण्याचा प्रयत्न गेल्या २५ वर्षांपासून अमेरिका करत आहे. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आता त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. टिलर्सन आणि ट्रम्प यांच्यादरम्यान तणाव असल्याची शंका अमेरिकी माध्यमांनी उपस्थित केली आहे. टिलर्सन सध्या चीन दौऱ्यावर आहेत.

दोन महिलांविरुद्ध किम जोंग नामच्या खुनाचा खटला   
मलेशियाच्या न्यायालयात दोन महिलांविरुद्ध उ. कोरियाचे नेते किम जोंग उन यांचे सावत्र बंधू किम जोंग नाम यांच्या खुनाचे आरोप निश्चित झाले आहेत. इंडोनेशियन नागरिक सिती असियाह आणि व्हिएतनामची नागरिक डोएन थी हूंग यांनी आपल्या वकिलांमार्फत आरोपांचा इन्कार केलाय. १३ फेब्रुवारी रोजी किम जोंग नाम यांची येथील विमानतळावर विषारी रसायनाद्वारे हत्या झाली होती. काही दिवसांतच दोन महिलांना अटक करण्यात आली होती.
 
पाकिस्तान, कतार, तुर्की दहशतवादाचे प्रायोजक
 पेंटागॉनच्या एका माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आता कतार, तुर्की आणि पाकिस्तानला दहशतवादाची प्रायोजक राष्ट्रे म्हणून घोषित करण्याची वेळ आली आहे. अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे रेसिडेंट स्कॉलर मायकल रुबिन यांनी एका लेखात हा आरोप केला आहे. पाकिस्तान निर्बंधापासून स्वत:ला वाचवू इच्छित असेल तर त्यांच्या भूमीवर असलेल्या दहशतवाद्यांना त्यांनी तुरुंगात टाकावे आणि त्यांना निधी देणे थांबवावे, असे मायकल यांनी लिहिले आहे.  

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाप्रमाणे अमेरिकी परराष्ट्र विभागदेखील १९७९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांची यादी तयार करत आहे. आतापर्यंत लिबिया, इराक, दक्षिण येमेन, सिरिया, क्युबा, इराण, सुदान आणि उ. कोरियाला दहशतवादाचे प्रायोजक म्हणून नोंदवले आहे. काळानुरूप अनेक देश या यादीतून वगळण्यात आले. आता इराण, सिरिया, सुदान यांचा यामध्ये समावेश आहे. रुबिन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय उघडपणे तालिबानला समर्थन देत आहे. जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांनादेखील मदत दिली जात आहे. आतापर्यंत पाकिस्तानचा समावेश या यादीत झाला नव्हता. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनीदेखील सिरियात इसिसला रसद पुरवली आहे.
बातम्या आणखी आहेत...