आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तानने अण्वस्त्रे कमी करायला हवी : आेबामा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारत आणि पाकिस्तानने अण्वस्त्रांची संख्या कमी केली पाहिजे. लष्करी शक्ती वाढवण्याचे प्रयत्न चुकीच्या दिशेने तर जात नाहीत ना, हेदेखील निश्चित झाले पाहिजे, असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी दिला आहे. अणू सुरक्षा परिषदेच्या समारोपाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आेबामा म्हणाले, उत्तर कोरिया सध्या आमचा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. यासंबंधी दक्षिण कोरिया आणि जपानसोबत आमची चर्चा झाली आहे. पाकिस्तानच्या वाढत्या आण्विक शस्त्रागाराच्या पार्श्वभूमीवर आेबामा यांच्या टिप्पणीला महत्त्व आले आहे. अणू सुरक्षा संमेलनादरम्यान सायबर हल्ल्यांचा बीमोड करण्यासाठी जागतिक नेत्यांसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. आण्विक आणि रेडिआे लहरींच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी परस्परांकडे गोपनीय माहितीची देवाणघेवाण केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनीदेखील अमेरिका आणि रशियाचे उदाहरण देताना पाकिस्तानने आपल्या आण्विक कार्यक्रमाला आवर घालावा, असे म्हटले होते.
‘दहशतवाद्यांच्या हाती शस्त्रे पडू नयेत’
अण्वस्त्रे शक्ती असलेल्या सर्व देशांनी आपल्याकडील शस्त्रागारांची सुरक्षितता वाढवली पाहिजे. त्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून आण्विक शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडू नयेत. आतापर्यंत कोणताही दहशतवादी गट अणुबाॅम्ब तयार करण्याची सामग्री एकत्र करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही. अल-कायदाने त्यासाठी फार पूर्वीच प्रयत्न केले होते. माथेफिरू दहशतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे पडल्यास ते मोठा हिंसाचार घडवू शकतात, असा इशारा आेबामा यांनी दिला.
मोदी सौदी अरेबियात, सुरक्षा करार करणार
अणु परिषद आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियामध्ये दाखल झाले. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा आहे. या भेटीत सौदीसोबत सुरक्षा सहकार्य करार होणार आहेत. खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींचे शनिवारी स्वागत झालेे. गेल्या सात महिन्यांतील मोदींची ही दुसरी भेट आहे. सौदीमध्ये सुमारे ८० लाख भारतीय राहतात. भारताच्या ऊर्जा सुरक्षेची भिस्त सौदीवर आहे.
आयएईएला ६.६६ कोटी रुपये; माेदींची घोषणा
आण्विक सुरक्षा परिषदेच्या समारोपाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आण्विक सुरक्षा आणि प्रसारबंदीसंबंधी अनेक उपाय सुचवले. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीचे पालन करत आहोत. अशा उपाययोजनांमुळे दहशतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे पडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाऊ शकते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेला (आयएईए) १० लाख डॉलर (६.६६ कोटी रुपये) देण्याची घोषणा करण्यात आली. आण्विक संस्थांची रचना, स्वतंत्र नियामक तसेच प्रशिक्षित आणि तज्ज्ञ व्यक्तींना आण्विक सुरक्षेत स्थान देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. तंत्रज्ञान विकास आणि त्याचा योग्य वापर याद्वारे दहशतवाद्यांना रोखणे इत्यादी उपाय पंतप्रधानांनी सुचवले. देशाची भूमिका मांडणे आणि पाकिस्तानवर दबाव वाढवण्यातही माेदी यशस्वी झाल्याचे दिसून आले.