आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाता-जाता आेबामांना धक्का; पहिल्यांदाच फेटाळला व्हेटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांना जाता-जाता अमेरिकेच्या संसदेने मोठा धक्का दिला आहे. पुढल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या एक महिना अगोदर संसदेने ९/ ११ च्या विधेयकावरील आेबामांच्या व्हेटोला नाकारले आहे.

आेबामा यांनी आठ वर्षांत संसदेकडून मंजूर विधेयकांवर १२ व्हेटो आणले होते. यापैकी पहिल्यांदाच त्यांच्या विशेषाधिकारास सभागृहाने फेटाळून लावले आहे. धक्कादायक म्हणजे संसदेने हा व्हेटो बहुमताने फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे ९ / ११ संबंधीचे विधेयक कायद्याला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे देशावरील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईक सौदीवर खटला चालवू शकतील. व्हेटोला नाकारणे अमेरिकेसाठी घातक आहे, असे आेबामा यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून आेबामा यांचा हा अखेरचा व्हेटो होता. जानेवारीत आठ वर्षे पूर्ण होतील.

आेबामांवर होता सौदीचा दबाव
आमच्यावर खटला चालवण्याची परवानगी देण्यात आल्यास सगळी गुंतवणूक काढून घेण्यात येईल, अशी धमकी सौदी अरेबियाने दिली होती. त्यामुळे आेबामा यांच्यावर दबाव होता. कायदा तयार झाल्यानंतर अमेरिकी सैनिकांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाईल. त्यामुळे अमेरिकेच्या हितसंबंधाला धोका निर्माण होऊ शकतो, असे आेबामा यांचे म्हणणे आहे.
खासदारांचे म्हणणे
९/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी विमान अपहरण करणारे १९ पैकी १५ वैमानिक सौदीचे होते. त्यामुळे हा हल्ला सौदीकडून प्रायाेजित मानला जावा. हल्ल्यात ३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नातेवाईक १५ वर्षांनंतरही न्यायाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे कायदा हवाच, अशी समर्थक खासदारांची भूमिका आहे.

डाआे केमिकल्सकडूनही रोखण्यासाठी प्रयत्न
हा कायदा रोखण्यासाठी सौदी अरेबिया सरकारबरोबरच अमेरिकेच्या कंपन्यांनी देखील जोर लावला होता. त्यात जनरल इलेक्ट्रिक व डाआे केमिकल्स देखील सहभागी हाेते. डाआे केमिकल्समध्ये युनियन कार्बाइडची गळती झाली होती. ही कंपनी भोपाळ वायू गळतीच्या घटनेस जबाबदार आहे.
सिनेट
१०० : एकूण सदस्य
९७ : व्हेटोच्या विरोधात
०१ : व्हेटोच्या बाजूने
४४ : सदस्य डेमोक्रॅटिक
प्रतिनिधीगृह
४३५ : एकूण सदस्य
३४८ : व्हेटोच्या विरोधात
७७ : व्हेटोच्या बाजूने
१८६ : सदस्य डेमोक्रॅटिक
बातम्या आणखी आहेत...