आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेबामांचे शेंडेफळ शिकते रेस्तराँमध्ये काम, मॅसाच्युसेट्समध्ये गिरवतेय फूड सर्व्हिसचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅसाच्युसेट्स (अमेरिका) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांची धाकटी मुलगी साशा सध्या मॅसाच्युसेट्सच्या एका रेस्तराँमध्ये सेवा देत आहे. राष्ट्राध्यक्षांची मुलगी सेवा देताना स्थानिकांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मीडियातही त्याची चर्चा आहे.
साशा सध्या आपल्या समर व्हॅकेशनसाठी येथे आली आहे. रेस्तराँमध्ये ती फूड ऑर्डर घेणे, सर्व्ह करणे, बिलिंग व इतर कामकाज कसे करावे याचे धडे गिरवत आहे. मॅसाच्युसेट्समधील मारथाज विनेयार्डच्या नॅन्सी रेस्तराँमध्ये त्यांचे प्रशिक्षण शनिवारपर्यंत चालणार आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयुष्यातील १५ पैकी ८ वर्षे अत्यंत विलासी जीवन व्यतीत करणारी साशा आेबामा जीवनाचा दुसरा पैलू शिकू लागली आहे. १५ वर्षांची साशा व्हाइट हाऊसमध्ये असते तेव्हा तिच्या दिमतीला सपोर्ट स्टाफची फौज तयार असते. रात्रंदिवस तिच्या खाण्याची फर्माईश पूर्ण करण्यासाठी कूक आहेत. घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी गुप्तहेर विभागातील अधिकारी, जवान तैनात असतात. परंतु रेस्तराँमध्ये मात्र साशाला सामान्य मुलीसारखी वागणूक मिळत आहे. थाटमाट तर मुळीच नाही. दरम्यान, हे रेस्तराँ बराक आेबामा यांच्या कुटुंबाचे अतिशय आवडते रेस्तराँ आहे. आेबामा दांपत्य फिरायला जातात तेव्हा या रेस्तराँमध्ये ते आवर्जून हजेरी लावतात. नॅन्सी रेस्तराँचे मालक व आेबामा कुटुंबात चांगला परिचय आहे. साशा रेस्तराँमध्ये चार तासांची शिफ्ट करते. शनिवारी आेबामा कुटुंबीय समर व्हॅकेशनसाठी तेथे पोहचेल. तिच्या निर्णयामुळे कुटुंबाच्या आनंदात आणखी भर पडणार आहे.
नाव बदलून काम
साशा आपल्या मूळ नावाने येथे काम करत नाही. नताशा नावाने ती काम करू लागली आहे. तिच्या सुरक्षेसाठी सहा सुरक्षा जवान असल्याचा दावा मीडियाच्या वृत्तातून करण्यात आला आहे.
रेस्तराँचा युनिफॉर्म
साशा रेस्तराँमध्ये काम करतानाचे छायाचित्र जाहीर झाले आहे. छायाचित्रात साशा ब्ल्यू टी शर्ट, हॅट व खाकी पँट परिधान केलेली दिसते.
बातम्या आणखी आहेत...