जेद्दाह - इस्लामचे पवित्र शहर मक्का मधील अल हरम मशिदीत शुक्रवारी एक क्रेन तुटल्यामुळे झालेल्या अपघातात 107 जणांचा मृत्यू झाला होता. मक्काचे गव्हर्नर प्रिन्स खालीद-अल-फैजल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सौदीचे शासक किंग सलमान यांनीही याचे कारण शोधणार असल्याचे म्हटले आहे.
अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर किंग सलमान म्हणाले की, आम्ही सर्व कारणांचा अभ्यास करू, आणि नंतरच याबाबत माहिती देऊ. प्राथमिक दृष्ट्या अधिकारी या घटनेसाठी जोरदार पाऊस आणि हवा कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. तर एका इंजिनीअरने हा प्रकार म्हणजे अॅक्ट ऑफ गॉड असल्याचे म्हटले आहे.
मानवी चूक नाही...
मशिदीच्या परिसरात कन्सट्रक्शनचे काम करणाऱ्या बिन लादेन ग्रुपच्या इंजिनियरने सांगितले की, अपघात कोणत्याही तांत्रिक कारणाने झालेला नाही. मी फक्त एवढे सांगू शकतो की, जे काही झाले ते सर्व मानवी क्षमतांच्या पलिकडचे होते. माझ्या मते हे अॅक्ट ऑफ गॉड म्हणजे(देवाची इच्छा) आहे. माझ्या माहितीनुसार हा अपघात कोणत्याही मानवी चुकीमुळे झालेला नाही. या इंजिनीअरच्या मते जी क्रेन तुटली ती अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने लावण्यात आली होती. मक्का येथे येणारे हज यात्रेकरू काबाला एक फेरा मारतात. या परिसराच्या विस्तारासाठी ही क्रेन लावण्यात आली होती.
अद्याप अनेक बेपत्ता
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशियाचे सहा जण अजूनही बेपत्ता आहेत. त्याशिवाय मेलेल्या अनेकांची ओळखही अद्याप पटलेली नाही. या अपघातात सुमारे 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
यात्रा सुरू राहणार
सौदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघाताचा हज यात्रेवर काहीही परिणाम होणार नाही. ही यात्रा ठरलेल्या नियोजनानुसारच होणार आहे. मशिदीत झालेली हानी काही दिवसांत भरून काढली जाईल. दरवर्षी याठिकाणी लाखो प्रवासी हज यात्रेसाठी येत असतात. या वर्षी ही यात्रा 21 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागते.
सुरक्षेचे उपाय वाढवले
मक्काच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारी एजन्सीचे प्रमुख हाशीम अल फलेह म्हणाले, कॉन्ट्रॅक्टरला सर्व क्रेनचे सेफ्टी स्टँडर्ड्स दोन वेळा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. मशिदीचा काही भाग शनिवारी बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, जखमींना रक्त देण्यासाठी सौदी आणि परदेशातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे PHOTOS