आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Oil, Natural Gas, Will Cooperate, The Information Technology Sector, India Indonesian Determination To Eradicate Terrorism

तेल, नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करणार , दहशतवादाच्या निर्मूलनासाठी भारत-इंडोनेशियाचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : भारत आणि जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया यांनी दहशतवाद निर्मूलनासाठी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा निर्धार सोमवारी व्यक्त केला. संरक्षण सहकार्य वाढवणे, दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे यांवरही दोन्ही देशांत एकमत झाले.

भारताच्या दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांनी तेल आणि नैसर्गिक वायू, औषधी निर्माण, माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास या क्षेत्रांत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यात भर दिला.
चर्चेनंतर प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादी कारवायांचा निषेध केला आणि तो मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या देशांनी हा प्रकार तत्काळ रोखावा तसेच सीमापार दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, असे आवाहनही दोन्ही नेत्यांनी जागतिक समुदायाला केले आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले, इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ही दक्षिण-पूर्व आशियामधील सर्वात मोठी आहे,तर भारताची अर्थव्यवस्थाही जगातील सर्वाधिक वेगाने वाढत आहे. दोन मोठे लोकशाही देश आणि मोठ्या उगवत्या अर्थव्यवस्था असल्याने आमचे आर्थिक आणि व्यूहरचनात्मक उद्देश सारखेच आहेत.

दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांत या वर्षी ऑगस्टमध्ये तर नौदल अधिकाऱ्यांत गेल्या वर्षी जूनमध्ये चर्चा झाली होती. ती यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल मोदी आणि विडोडो यांनी समाधान व्यक्त केले. या चर्चेमुळे संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी मदत झाली, असा उल्लेखही दोन्ही नेत्यांनी केला. संरक्षण सहकार्याबाबत पुढेही चर्चा सुरू ठेवणे, प्रशिक्षण आणि संयुक्त सराव यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. संरक्षण साहित्याच्या संयुक्त उत्पादनांसाठी सहकार्य करण्याची शक्यता दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी पडताळून पाहावी असेही चर्चेत ठरले आहे, असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आशियानमधील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार
इंडोनेशिया हा भारताचा आशियानमधील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांत २००७-२००८ मध्ये दिव्पक्षीय व्यापार ६.९ अब्ज अमेरिकन डॉलर होता, तो आता २०१४-१५ मध्ये १९.०३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. जागतिक आर्थिक स्थिती तसेच इंडोनेशियाने कमी आयात केल्याने हा व्यापार ९ अब्ज डॉलरपर्यंत घसरला होता.

तीन करारांवर स्वाक्षऱ्या
द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात क्रीडा क्षेत्रात सहकार्य करणे,भारतीय प्रमाणीकरण संस्था तसेच इंडोनिशियाची प्रमाणीकरण संस्था यांच्यात सहकार्य तसेच अवैध मासेमारी रोखणे यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...