आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शी जिनपिंग यांचा जुना मित्र अमेरिकेच्या चीन राजदूतपदावर, नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांची चीनशी सलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी नवी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी शी जिनपिंग यांचे जुने मित्र टेरी ब्रॅनस्टॅड यांना चीनचे राजदूत म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रॅनस्टॅड व जिनपिंग यांचा परिचय १९८० पासून आहे. ७० वर्षीय ब्रॅनस्टॅड हे सध्या ईवा प्रांताचे राज्यपाल आहेत. ब्रॅनस्टॅड यांच्याकडे सार्वजनिक जीवनाचा दीर्घकालीन अनुभव आहे. त्याशिवाय जिनपिंग यांच्याशीदेखील त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चीनचे इतर नेतेही त्यांना आदर्श मानतात. त्यामुळेच अमेरिकेचे राजदूत म्हणून ते उत्तम प्रकारे काम पाहू शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने या घोषणेचे स्वागत केले आहे.

व्यापाराच्या दृष्टीने तयारी : अमेरिकेला चीनशी व्यापारी पातळीवरील संबंध आणखी सदृढ करण्याची इच्छा आहे. ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे हाती घेण्याच्या अगोदरच नव्याने मांडामांड करण्यास सुरुवात केली आहे. ब्रॅनस्टॅड हे अमेरिकेचे आदर्श प्रतिनिधित्व करू शकतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.

तैवानवरून तणाव : अमेरिका व चीनमध्ये तैवानच्या मुद्द्यावरून तणाव असतानाच ही घोषणा झाली आहे. त्यामुळे उभय देशांतील संबंध पुन्हा सामान्य होण्यास मदत मिळणार आहे. खरे तर ट्रम्प यांनी तैवानचे अध्यक्ष सॅई इंग वेन यांच्याशी निवडणुकीतील विजयानंतर फोनवरून चर्चा केली होती. त्यावरून उभय देशांतील तणाव वाढला. तैवान हा चीनचा अविभाज्य घटक असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

माझ्या कुटुंबीयांशी चर्चा
ट्रम्प यांनी माझ्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. अमेरिकेचे चीनमध्ये नेतृत्व करण्याची संधी ट्रम्प यांनी देऊन माझा गौरव केला आहे. जिनपिंग यांना मी माझा जुना मित्र मानतो. आमची मैत्री दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट करेल. त्याचा लाभ उभय देशांच्या अर्थव्यवस्थेलादेखील होईल, असे ब्रॅनस्टॅड यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...