आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ओबामांनी लढवावी फ्रान्स अध्यक्षपदाची निवडणूक’, मागणीसाठी ऑनलाइन याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्समध्ये या वर्षी एप्रिलमध्ये २५ व्या राष्ट्राध्यक्षांची निवड होत आहे. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामाही चर्चेत आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी मागणी लोक करत आहेत. निवडणुकीत उभे राहण्यासाठी अजूनही बराच कालावधी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.   
 
पॅरिसमध्ये चार मित्रांच्या गटाने ‘ओबामा १७’ नावाने एक संकेतस्थळ बनवले आहे. त्यावर त्यांनी ओबामांना फ्रान्सचा अध्यक्ष बनवण्यासाठी गेल्या सोमवारपासून मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर एक ऑनलाइन याचिकाही टाकली आहे. आतापर्यंत त्यावर ३० हजारपेक्षा जास्त लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या मागणीवर १० लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या झाल्या तर ही याचिका स्वीकारली जाईल. त्याचबरोबर सोशल मीडियावरही ओबामांना अध्यक्ष बनवण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. पॅरिसच्या गल्ल्यांत जागोजागी ओबामांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रत्येक जण या याचिकेवरच चर्चा करत आहे.  
 
या ग्रुपच्या म्हणण्यानुसार, ओबामांनी अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी सादर करावी. त्यांच्याकडे १५ मार्चपर्यंतची मुदत आहे. ग्रुपच्या सदस्याने सांगितले की, आम्ही चौघे अध्यक्षपद निवडणुकीबाबत चर्चा करत होतो, तेव्हा ही मोहीम सुरू करण्याची कल्पना सुचली. आमच्याकडे अध्यक्षपदासाठी चांगला उमेदवारच नाही. संपूर्ण प्रचार मोहीम स्कँडल आणि घोटाळ्यांनी भरले आहे. प्रत्येक उमेदवार घृणा फैलावण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाची विभागणी केली जात आहे. 

त्यामुळे आम्हाला राग येतो. पसंत नसलेल्या व्यक्तीला मत द्यावे लागणार असल्याने आम्ही त्रस्त आहोत. त्यामुळे आम्ही कोणालाही मत देणार नाही. गेल्या वेळीही आम्ही असेच केले होते. दुसऱ्या सदस्याने सांगितले की, हा वेडेपणा आहे हे आम्ही जाणतो. पण या मोहिमेचा हेतू खूप गंभीर आहे हे आम्ही जाणतो. लोकांना येथील राजकीय नेत्यांचा वीट आला आहे हे आम्हाला दाखवायचे आहे. त्यांना असे विनोद आवडत आहेत. एवढ्या नकारात्मक परिस्थितीतही लोक स्मितहास्य करत आहेत हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला त्यात यश मिळाले आहे.  आणखी एक संस्थापक म्हणाला की, हे शक्य असल्याची जाणीव लोकांना होत आहे, ही या मोहिमेची सर्वात चांगली बाब आहे. ओबामा फ्रेंच नागरिक नाहीत. त्यांना फ्रेंच भाषाही येत नाही, पण त्याची पर्वा कोणाला? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते बराक ओबामा आहोत.  

जगात ओबामांचा रिझ्युम सर्वोत्कृष्ट  
संकेतस्थळावर लिहिले आहे की, ‘ओबामांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना फ्रान्सचा अध्यक्ष निवडावे का? ओबामांचा रिझ्युम या पदासाठी सर्वोत्कृष्ट आहे. त्यांना अध्यक्ष निवडून आम्ही जगाला संदेश देऊ.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...