क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया)- गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात १३ वर्षीय तायला सेखमेटचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. तिचे नाव गाजण्याचे कारणही आहे. शाळेत मित्र-मैत्रिणींनी केलेली चेष्टा-मस्करी, त्यांच्या धमक्यांनी त्रस्त तायलाने अत्यंत भावुक भाषेत ऑनलाइन पत्र लिहिले.
यात तिने शाळेतील या प्रकारांवर आवर घालून दोषींवर कारवाईचे आवाहन सरकारला केले होते. त्यासाठी तिने स्वाक्षरी मोहीम सुरू केली. यावर आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याविरुद्ध कठाेर कायदा करण्यात यावा, अशी मागणी हे लोक करत आहेत. आपल्या मुलांचे अनुभवही पालक यात टाकत आहेत.
माझे नाव तायला सेखमेट. मी क्वीन्सलँडस्थित डायसार्ट स्टेट हायस्कूलची विद्यार्थिनी. माझी आई कायलीची मदत घेऊन मी हे पत्र लिहीत आहे. मी माझ्या शाळेतील सर्वांत अप्रिय मुलगी. या विद्यार्थ्यांनीही मला अगदी नकोसे करून सोडले आहे. रोज मला जाड, विचित्र, बधिर म्हणून चिडवतात. तू जगून काय उपयोग, असेही म्हणतात. मैदानात ते मला मुद्दाम धक्के देऊन पाडतात. कधी माझी बॅग फेकून देतात. गाडीचे नुकसान करतात. वरच्या वर्गातील मुलेही माझ्याशी असेच वागतात. मी त्यांना तर ओळखतही नाही. वर्गात जाते तेव्हा ही मुले माझा व्हिडिओ काढतात. तो इंटरनेटवर टाकू म्हणून धमकावतात. एक मुलगा तर सतत माझी छेड काढतो.काही लैंगिक बाबतीत अफवाही पसरवल्या जातात. इथे मी त्याचा उल्लेख करू शकत नाही. अनेक शिक्षकांकडे मी याची तक्रार केली आहे. आई कायली हिनेही शाळेत शिक्षकांना या बाबतीत सांगितले आहे. परंतु, कुणीच मदत केली नाही. या मुलांकडे लक्ष देऊ नकोस, असा सल्ला त्यांनी दिला. यापेक्षा अधिक काही करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आता मी कुणाकडे दाद मागू, हेच कळत नाही. मला जगणे नकोसे झाले आहे. माझ्या या पत्रावर तुम्ही स्वाक्षऱ्या करा, असे मी आवाहन करते. या प्रकारांविरुद्ध कारवाई करा, असे या पत्राच्या माध्यमातून शाळेला सांगावयाचे आहे. सरकारलाही सांगा, हे प्रकार कायमचे बंद करण्यासाठी काहीतरी करा. जेणेकरून माझ्यासारख्या मुलींना जगणे नकोसे वाटणार नाही.’
तायलाची आई कायली सांगते, ‘जगभरातील लोक हजारोंच्या संख्येने पाठिंबा देत असल्याचे तायलास कळले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. ती म्हणाली, जगाला माझी किती काळजी आहे...या लोकांचे प्रेम पाहून मी भारावले आहे...आता जगण्याबद्दलची माझी इच्छा दृढ होत आहे.’