आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेंदूवर शस्त्रक्रियेवेळी रुग्णाचे गिटारवर गायन, ब्राझीलमध्ये ब्रेन ट्यूमरचे आगळे आॅपरेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँटा कॅटेरिना (ब्राझील) - ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी डाॅक्टरांनी एका रुग्णावर शस्त्रक्रिया केली. नऊ तास ती चालली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हा रसिक रुग्ण मात्र गिटार वाजवून गाणे गात राहिला.

ब्राझीलमधील सांता कॅटेरिनामध्ये ही आगळी घटना घडली. ३३ वर्षीय अँथनी कुलकँप डियास म्हणायला तसे बँक कर्मचारी आहेत, परंतु २० वर्षांपासून त्यांना गिटार वाजवण्याचा छंद आहे. काही महिन्यांपासून अँथनी बोलताना अडखळत होते. रोजच्या वापरातील वस्तूंची नावे घेणेही कठीण जात होते. कारचे नावही त्यांना उच्चारता येत नव्हते. तपासणीत ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. आॅपरेशन सुरू असताना मेंदूच्या दुस-या भागावर लक्ष ठेवावे लागते. म्हणून तुम्हाला पूर्णपणे बेशुद्ध करता येणार नाही, असे डाॅक्टरांनी त्यांना आधीच सांगितले होते. त्यामुळे डोक्याच्या फक्त वरच्या भागाला भूल देण्यात येणार होती. तेव्हा अँथनी यांनी गिटार वाजवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावर डाॅक्टरही राजी झाले. कारण यामुळे किचकट शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूचे माॅनिटरिंग करणे अधिक सोपे जाणार होते. शस्त्रक्रिया सुरू होताच अँथनी गिटारची धून वाजवायला लागले. सहा गाण्यांच्या सुरावटी त्यांनी वाजवल्या, काही गाणीही गायली. त्यात आपल्या मुलासाठी लिहिलेले एक गाणेही होते. एका डाॅक्टरने वन्स मोअर दिला. त्यांनी गाणे पुन्हा गायले.

अँथनी म्हणाले, डाॅक्टर जेव्हा ब्रेनच्या उजव्या बाजूचे आॅपरेशन करत होते तेव्हा माझा सरळ हात थोडा कमकुवत वाटत होता. तेव्हा मी थोडा वेळ आराम केला. डाॅक्टर जाॅन मचादो म्हणाले, अँथनी यांचे ९० टक्के ट्यूमर काढण्यात आले आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.