आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठाण्याएवढी साल पडली अाठ लाखांना! संत्र्याची साल चुकून डस्टबिनबाहेर पडल्याचा खटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पन्नास पैशांच्या आकाराची संत्र्याची साल सरकारी तिजाेरीवर सुमारे आठ लाख रुपयांचा बोजा टाकू शकते. विश्वास बसत नसेल तर ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर काउंटीच्या होडेसडन भागातील हा किस्सा ऐका.

दिनांक ३ सप्टेंबर २०१४... सेल्समनची नोकरी सोडून गोल्फ खेळाडू बनलेल्या ल्यूक गटरिज याने संत्री विकत घेतली. मोह न आवरल्याने एक संत्रे मटकावून साल रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये फेकली. मात्र चुकून एक तुकडा डस्टबिनच्या बाहेर पडला. तो उचलून पुन्हा डस्टबिनमध्ये टाकणार तोच काैन्सिलच्या (नगरपालिका) कर्मचा-याने त्याला पाहिले. त्याला काैन्सिलने स्वच्छतेच्या कामाची देखरेख करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमले होते. त्याने कचरा फैलावण्याचा आरोप करत ल्यूकला ७५ पाउंड (७३९४ रु.) दंड ठोठावला. साल चुकूनच खाली पडली, घाण करण्याचा उद्देश नसल्याचे सांगत ल्यूकने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. माफीही मागण्यास तयार असल्याचे सांगितले. ती मागितलीही. मात्र, कर्मचारी काही बधला नाही. त्याने ल्यूकला कोर्टात खेचण्याची धमकी दिली. काैन्सिलने आपल्या कर्मचा-याचीच साथ दिली. शेवटी प्रकरण कोर्टात गेले. नऊ महिने खटला चालला. निकाल ल्यूकच्याच बाजूने लागला. त्याने जाणूनबुजून साल फेकली नसल्याचे सिद्ध झाले.

आता होडेसडन काउन्सिल ल्यूकचीही कोर्ट फीस अदा करेल. ती रक्कम सुमारे ८ हजार पाउंडच्या (सुमारे आठ लाख रुपये) जवळपास आहे. यानंतर काैन्सिलच्या प्रवक्त्या म्हणाल्या, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आमच्या प्रयत्नांची कोर्टाने प्रशंसा केली आहे. मात्र, या खटल्यात आमचे पुरावे कमकुवत सिद्ध झाले.. बस इतकंच.

काैन्सिल चूक करत आहे
या खटल्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. काैन्सिल कायदा चुकीच्या पद्धतीने लागू करत आहे.
- डॉ. मायकेल रॅम्सडेन, ल्यूकचे वकील

अधिकारी समंजस व्हावेत...
कायदा पाळताना अधिका-यांनी समंजसपणा दाखवावा. जनतेची प्रतिक्रिया काय असेल, यावर ध्यान द्यावे.
- मॅजिस्ट्रेट, निकाल सुनावताना