आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 मुंबई हल्ला : पाक कोर्टाने दहशतवाद्यांच्या बोटीची चौकशी फेटाळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुंबई दहशतवादी हल्ल्याची सुनावणी करत असलेल्या पाकमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीची चौकशी करण्यास नकार दिला आहे. बचाव पक्षाने या बोटीच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे आग्रह धरला होता. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत हल्ला घडवून आणण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी "अल फौज' नामक बोट वापरली होती.
२३ नोव्हेंबर २००८ रोजी १० दहशतवादी एके-४७ आणि ग्रेनेडच्या मोठ्या साठ्यासह मुंबईकडे रवाना झाले होते. दरम्यान, ही बोट कोणत्या दुकानातून खरेदी करण्यात आली आणि त्यासाठी कितीचा व्यवहार ठरला होता याचा तपास सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेला आहे. ही बोट सध्या कराचीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. पुराव्याच्या रूपात सादर करण्याचे बचाव पक्षाचे प्रयत्न होते. दरम्यान, ६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारीला होईल. त्यासाठी ४ साक्षीदारांना समन्स जारी केले आहेत.

लख्वीला अटक, सध्या जामिनावर बाहेर
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लख्वीसह सात दहशतवाद्यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. पाकमधील न्यायालयात २००९ पासून त्यांच्यावर खटला सुरू आहे. मात्र, डिसेंबर २०१४ मध्ये लख्वीला जामीन मिळाला. १० एप्रिल रोजी रावळपिंडी तुरुंगातून त्यास सोडण्यात आले.

१६६ लोकांचे प्राण गेले
कराचीहून समुद्रमार्गे मुंबईकडे येत असताना दहशतवाद्यांनी वाटेत एका अन्य बोटीचे अपहरण केले होते. त्या बोटीच्या चालक दलातील ४ सदस्यांची हत्या केल्यानंतर मुंबई समुद्रकिनाऱ्याजवळ बोटीच्या कॅप्टनचीही हत्या केली. त्याच बोटीने सर्व दहशतवादी मुंबईतील मासेमारी वस्तीजवळ उतरले आणि नंतर मुंबईत विविध ठिकाणी हल्ला करण्यास निघून गेले. या हल्ल्यात १६६ लोकांचे प्राण गेले होते.
बातम्या आणखी आहेत...