आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Arrested Maulana Masood Azahar In Pathankot Case

पठाणकोट: मसूद अझहर अटकेत, जैशच्या कार्यालयांवर छापे, पाकची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/ नवी दिल्ली - पठाणकोटमध्ये भारतीय हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानी पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी धडक कारवाई करत पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड व जैश-ए-माेहंमद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरसह काही जणांना अटक करण्यात अाली अाहे. दरम्यान, दहशतवादी संघटनांशी संबंधित इतर काही संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे जैश-ए-माेहंमद संघटनेच्या अनेक कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले असून पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या कारवाईचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावाही घेतला. पाकिस्तानने भारतात झालेल्या एखाद्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी निषेध करत पाकिस्तानने ठोस कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली होती. अमेरिकेने तर याबाबत पाकला स्पष्टपणे बजावले होते.
पाकिस्तानी अधिकारी पठाणकोटचा दौरा करणार
भारतीय हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक पठाणकोटला येत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या वक्तव्यानुसार, हे पथक घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करेल व भारताला तपासात सहकार्य करेल.
अझहरच्या भावासह १२ जणांना बेड्या
- मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रऊफ यालाही घेतले ताब्यात
- पठाणकाेट हल्ल्याचा हँडलर म्हणून रऊफचे नाव अाले हाेते.
- अझहरसाेबत त्याच्या दाेन नातेवाईकांनाही पकडले.
- बहावलपूरमध्ये या सर्वांवर पाेलिसांची धडक कारवाई.
१६ वर्षांपूर्वी कंदहार प्रकरणी साेडले हाेते
१९९९ मध्ये अतिरेक्यांनी भारतीय विमानाचे अपहरण करून ते कंदहारला (अफगाण) नेले हाेते. विमान प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात वाजपेयी सरकारला त्या वेळी मसूद अझहर याची सुटका करावी लागली हाेती.
पाक पीएमअाे सतर्क
पाक आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करू देणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे.
अमेरिकेचा दबाव
भारताच्या नव्हे, अमेरिकेच्या दबावाखातर ही कारवाई सुरू आहे. एफ-१६ जातीच्या विमानांचा व्यवहार फिसकटण्याची शक्यता पाहता अमेरिकेला खुश करण्यासाठी ही कारवाई दिसते. दोन्ही देशांत परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा व्हायला हवी.
जी. पार्थसारथी, परराष्ट्रविषयक तज्ज्ञ

कोणत्याही कारवाईसाठी सज्ज : लष्करप्रमुख सुहाग
भारतीय लष्कर कोणत्याही कारवाईसाठी सज्ज आहे, असे लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी म्हटले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यास सडेतोड उत्तर देण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सुहाग यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्यांवर हल्ले करण्याची लष्कराची योजना आहे का, असे विचारले असता सुहाग म्हणाले, व्याप्त काश्मीरमध्ये पूर्वी ४२ प्रशिक्षण छावण्या होत्या. आता ती संख्या १६ वर आली आहे.