न्यूयॉर्क - आण्विक सज्जता असलेले पाकिस्तान दक्षिण आशियाच्या शांततेच अडसर ठरू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणनंतर आता पाकिस्तानकडे बघण्याची वेळ आली आहे. भविष्यात या प्रदेशाला पाकिस्तानची आण्विक शस्त्रे सर्वाधिक धोकादायक ठरू शकतात, असा इशारा ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिला आहे.
सध्या जगाचे लक्ष इराणकडे आहे. इराणसोबतचा कराराचा अंतिम मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी प्रयत्नशील आहेत. या महासत्तांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता तत्काळ पाकिस्तानकडे बघण्याची वेळ आली आहे. कारण आण्विकदृष्ट्या अत्यंत धोकादायक देश म्हणून पाकिस्तान उदयाला आला आहे. हे विसरता कामा नये, असे वृत्तपत्राने
आपल्या लेखातून स्पष्ट केले आहे. ‘न्यूक्लियर फिअर्स इन साऊथ एशिया’ अशा शीर्षकाच्या लेखात हा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तान स्वत: अस्थैर्याचे कारण ठरणार आहे, हे स्पष्ट आहे.
चीनची संगत
पाकिस्तानने चीनच्या मदतीने आपले शस्त्रागार वाढवण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. पाकिस्तानच्या अणू शस्त्रांची संख्या २५० वर पोहोचली आहे, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लेखात नमूद केले आहे. चीन सातत्याने पाकिस्तानला मदत करत आला आहे. ती रोखण्याची गरज आहे.
भारताशी शत्रू म्हणून वागणूक
पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानी लष्कर भारताला कायम पारंपरिक शत्रूसारखी वागणूक देत असल्याचेही वृत्तपत्राने म्हटले.
हल्ल्याचा पर्याय ठेवला खुला
पाकिस्तानने संघर्षाच्या स्थितीत अणुहल्ला करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. तो पारंपरिक शस्त्रांचादेखील वापर करू शकतो. त्यांच्याकडील कमी पल्ल्याची आण्विक क्षेपणास्त्रे कमी वेळेत लक्ष्य भेदू शकतात, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
पैसा वाया घातला
पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांत देशातील अनेक महत्त्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ संरक्षण व्यवस्थेला सुसज्ज करण्यावर पैसा ओतला आहे. अब्जावधी डॉलर्स संरक्षण व्यवस्थेवर खर्च करण्यात आले आहेत. वास्तविक हा पैसा देशातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वापरायला हवा होता, अशी टीकाही अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्राने केली आहे.
नरेंद्र मोदी यांचा इशारा
भारताकडे ११०, तर पाकिस्तानकडे १२० आण्विक शस्त्रे आहेत. २००८ सारखा मुंबई हल्ला झाल्यास इस्लामाबादने जशास तशा उत्तरासाठी तयार राहिले पाहिजे, असे मोदी यांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांचा भूतकाळही अशांत राहिलेला आहे. उभय देशांत १९९९ मध्ये मोठा संघर्ष झाला होता, असे वृत्तपत्राने नमूद केले आहे.