वॉशिंग्टन - पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी मंगळवारी थेट धमकावत
आपल्या देशाकडे भारतावर हल्ले करण्यासाठी छोटे अणुबॉम्ब तयार असल्याचा दावा केला. कोणत्याही आघाडीवर भारताशी दोन हात करण्याची पाकची कशी क्षमता आहे, हे सांगताना त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत थेट आपल्या देशाकडे अणुबॉम्ब तयार असल्याची कबुलीच देऊन टाकली.
भारताविरुद्ध जाहीर भाष्य करताना आपल्या शक्तीचे असे थेट प्रदर्शन करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नवाज शरीफ २२ ऑक्टोबरला अमेरिकी अध्यक्ष बराक आेबामा यांची भेट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
आण्विक करारासाठी प्रयत्न
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन अमेरिका दौऱ्यांदरम्यान झालेले करार आणि मोदींना अमेरिकी भारतीय उद्योजक व विविध क्षेत्रांतील लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहता शरीफ यांचा हा अमेरिका दौरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे. या दौऱ्यात अमेरिकेशी भारतासारखाच आण्विक करार करून पदरी काही पाडून घेण्याचे शरीफ यांचे प्रयत्न आहेत. पाकने काही अटी मान्य केल्या तर आण्विक पुरवठादार गटाचा सदस्य म्हणून पाकला मान्यता दिली जाऊ शकते, हा पाकिस्तानी नेते व आण्विक शास्त्रज्ञांचा होरा आहे.
आण्विक करार नाहीच : दरम्यान, अमेरिकेशी आण्विक करार करून काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या आशेने अमेरिकी दौऱ्यावर जात असलेले शरीफ यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. कारण, व्हाईट हाऊसने अशा कराराची शक्यता फेटाळून लावली आहे. आण्विक सुरक्षेच्या मुद्यावरच शरीफ यांच्याशी ओबामा चर्चा करणार असल्याचे व्हाईट हाऊच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
अगोदर सीटीबीटी : आण्विक चाचणी बंदी करारावर (सीटीबीटी) भारताची वाट न पाहता पाकने स्वाक्षरी करावी ही अमेरिकेची भूमिका आहे. याशिवाय पाकने घातक शस्त्रांमध्ये पण कपात करावी, असे अमेरिकेचे धोरण आहे. यामुळे शरीफ यांच्या पदरी या अमेरिका दौऱ्यात भरपूर काही पडेल, याची शक्यता तूर्त तरी कमीच दिसत आहे.
आमचे लक्ष्य भारताचा संभाव्य हल्ला रोखणे
आमच्या आण्विक कार्यक्रमाचे एकमेव लक्ष्य भारताचा संभाव्य हल्ला रोखणे हे आहे. युद्ध पुकारण्यासाठी हा कार्यक्रम नाही. भारताच्या गनिमी काव्यावर हा उपाय आहे, असे एजाज चौधरी म्हणाले.
भीती कशाची?
एजाज यांनी पाककडे अणुबॉम्ब तयार असल्याचे सांगण्यामागे एक भीती दडलेली आहे. ती त्यांनी दुसऱ्या संदर्भांच्या आधारे स्पष्टही केली. ते म्हणाले, भारत शांतपणे पाकविरुद्ध रणनीती आखत आहे. पाकिस्तानी सीमेलगत उभारण्यात येत असलेल्या लष्करी छावण्या हे त्याचेच लक्षण आहे. या छावण्यांतून भारत आपली पारंपरिक शस्त्रे, लष्करी वाहने आणि इंधनाचा साठा सीमेवर वाढवत आहे.