आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी माध्यमांत असे आले होते वृत्त, काश्मीर प्रश्नावर पाठिंब्याची खात्री देण्यास चीनचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - परदेशी आक्रमण झाल्यास मदत करण्याची तसेच काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची खात्री देण्यास चीनने आठवड्यात दुसऱ्यांदा नकार दिल्याने पाकिस्तान चांगलाच तोंडघशी पडला आहे. यासंदर्भात पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताबद्दल चीनने कानावर हात ठेवले आहेत.
परदेशी आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानला मदत करेल तसेच काश्मीर प्रश्नावर पाठिंबा देईल, असे आश्वासन चीनचे लाहोरमधील कॉन्सूल जनरल यू बोरेन यांनी दिले आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआँग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राजदूताने असे वक्तव्य दिल्याची माहिती माझ्याकडे नाही. मात्र या मुद्द्यांवर चीनची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे शेजारी आणि मित्र आहोत. दोन्ही देश त्यांचे मतभेद चर्चेतून सोडवतील, परिस्थितीचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करतील तसेच दक्षिण आशियाचे स्थैर्य आणि विकास यासाठी संयुक्तपणे कार्य करतील, अशी आमची अपेक्षा आहे. काश्मीरबाबत बोलायचे झाल्यास हा प्रश्न इतिहासाशी संबंधित आहे.
काश्मीरप्रश्नी चीनचा पाकिस्तानला पाठिंबा राहील,असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांत आल्यानंतर चीनने आठवड्यात दुसऱ्यांदा ते फेटाळले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला गेले असताना चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये बैठक झाली होती. त्या वेळी ली यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे वृत्त ‘डॉन’मध्ये प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताबद्दल विचारले असता, दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय आणि समान हिताच्या विभागीय मुद्द्यांवर चर्चा झाली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लू कांग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले होते.
चीनचा आठवड्यात दुसऱ्यांदा नकार
चीनचे लाहोरमधील कॉन्सूल जनरल यू बोरेन यांची पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक झाली. परदेशी आक्रमण झाल्यास आमचा देश पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासन यू यांनी या बैठकीत शरीफ यांना दिले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. तसेच, काश्मीरप्रश्नी आम्ही पाकिस्तानसोबत आहोत आणि राहू. कुठल्याही स्थितीत काश्मीरमधील नागरिकांवरील अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही तसेच काश्मिरी नागरिकांच्या आकांक्षेनुसार काश्मीर वादावर तोडगा काढायला हवा, असे मत यू यांनी व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...