वॉशिंग्टन - पाकिस्तानने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. परराष्ट्र सचिव एजाज अहमद म्हणाले, पाकिस्तान या करारास भेदभावपूर्ण मानते. त्यामुळे त्यावर स्वाक्षरी केली जाणार नाही.
पाकिस्तानवर स्वाक्षरीसाठी दबाव आला तर ती केली जाईल काय, या प्रश्नावर एजाज यांनी करार भेदभावपूर्ण असल्याचे "डॉन'च्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानला आपल्या सुरक्षेचा अधिकार आहे. त्यामुळे एनटीपीवर स्वाक्षरी करणार नाही. आम्ही स्वाक्षरी का करावी? सन १९७० मध्ये एनटीपी अस्तित्वात आल्यानंतर १९० देशांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान नकार देत आले आहेत. एजाज सध्या अमेरिका दौ-यावर आहेत. त्यांनी भारतीय गुप्तचर संस्था "रॉ'च्या कथित कारवायांची तक्रार केली आहे. रॉ पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
उत्तर कोरियाचे कोणतेही ठिकाण
द. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यात
सेऊल | दक्षिण कोरियाने दोन लांब पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. उत्तर कोरियातील कोणत्याही भूप्रदेशावर मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांत आहे. प्योंगयांगने आपल्या अण्वस्त्र व क्षेपणास्त्र क्षमतांचे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर दक्षिण कोरियानेही या चाचण्यांद्वारे युद्ध सामग्रीची चाचणी घेतली. यात महत्त्वाची बाब म्हणजे या चाचणीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन हे यांनी खुद्द हजेरी लावली.
उत्तर कोरियाच्या सैनिक कवायतींवर प्रतिक्रिया
उत्तर कोरियातील कोणत्याही स्थळाला लक्ष्य करण्याची ताकद या क्षेपणास्त्रात असून याची संपूर्ण बनावट देशी असल्याचे द. कोरियाच्या संरक्षण सूत्रांनी सांगितले. उ. कोरियाने महिनाभरापूर्वीच क्षेपणास्त्र सज्ज पाणबुड्यांची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. मात्र, अनेक युद्धनीतिज्ञांनी हा दावा खोटा असल्याची टिप्पणी केली होती. कोरियन महाद्वीपात किंवा त्याबाहेरील अण्वस्त्र आक्रमणांनाही सडेतोड उत्तर देण्यास उ. कोरिया सक्षम असल्याचेच यामुळे सिद्ध होईल.
सहकार्याने आण्विक हल्ल्यांसाठी समर्थ
द. कोरियाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्रांची क्षमता ५०० किलोमीटरपर्यंत १ टन पेलोड वाहून नेण्याची आहे. वर्ष २०१२ मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण सहकार्य करारांतर्गत यांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे तिपटीने सैनिक सामर्थ्य वाढल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले. वर्ष २०१४ मध्येही या क्षेपणास्त्रांची चाचणी झाली होती. अमेरिकेचे २८ हजार ५०० सैन्य द. कोरियात असून आण्विक अंब्रेला क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे द. कोरिया आयुधांमध्ये जास्त समर्थ असल्याचे अधोरेखित झाले आहे.