आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकने १० दहशतवाद्यांचे मृतदेह कबरीतून काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानने जून २०१४ मध्ये कराची विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी चकमकीत ठार झालेल्या १० विदेशी दहशतवाद्यांचे मृतदेह कबरीतून उकरून काढले आहेत. या १० पैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचा संशय प्रशासनाला असून त्यांचे डीएनए नमुने घेण्यात येणार आहेत.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इधी फाउंडेशनच्या कब्रस्तानातून मंगळवारी हे मृतदेह बाहेर काढले. या दहशतवाद्यांची ओळख पटवणे हा त्यामागील हेतू आहे. या वेळी न्यायदंडाधिकारी आणि पोलिसही उपस्थित होते. हे सर्व १० दहशतवादी विदेशी नव्हेत, तर त्यापैकी दोघे कराचीचे होते, असे या हल्ल्याच्या चौकशीच्या वेळी अधिकाऱ्यांना आढळले होते. त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्यासाठी मृतदेह काढण्यात आले, असे वृत्त या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘डॉन’ने दिले आहे.

पोलिस, डॉक्टरांचे पथक आणि न्यायदंडाधिकारी हे कडक सुरक्षा व्यवस्थेत कब्रस्तानात गेले. तेथे मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यासाठी त्यांना १० कबरी खोदाव्या लागल्या. ‘आम्ही सर्व मृतदेहांची हाडे, दात, नखे आणि केसांचे नमुने घेतले,’ अशी माहिती पोलिस सर्जन डॉ. एजाज अहमद खोखर यांनी दिली. सुरुवातीला या नमुन्यांची कराची येथेच तपासणी केली जाईल. त्यानंतर ते इस्लामाबादला पाठवले जातील.
बातम्या आणखी आहेत...