संयुक्त राष्ट्र - पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन बनले आहे. दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातही दहशतवादाला समाविष्ट करण्यात आले आहे. दहशतवादावर उपाययोजनेसाठी पाकिस्तानला योग्य पद्धतीने समज देण्यात यावी, अशी मागणी अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे.
अफगाणिस्तानात सातत्याने असुरक्षित वातावरण वाढले आहे. त्याचा परिणाम जगाच्या इतर प्रदेशांवरदेखील होत आहे. वास्तविक पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय दिला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तानात राजकीय, संस्थात्मक, आर्थिक, सोयी-सुविधांच्या पातळीवर पाठिंबा मिळतो, असा आरोप अफगाणिस्तानचे स्थायी राजदूत मोहम्मद सैकल यांनी केला आहे. सुरक्षा परिषदेत मंगळवारी आयोजित एका चर्चासत्रात सैकल यांनी देशाला असलेल्या धोक्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. सैकल यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता तेथील सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.
जगाच्या कानाकोपऱ्यात हिंसाचार होत आहे. त्यात असंख्य लोकांना नाहक बळी जावे लागत आहे. प्राण देऊन त्यांच्यावर मोठी किंमत मोजण्याची वेळ आली आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल करावे लागणार आहेत, असे गुटेरिस यांनी म्हटले आहे.