वॉशिंग्टन - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारताला धमकी दिली आहे. आसिफ म्हणाले, 'भारताने जर आमच्या अण्वस्त्रांच्या ठिकाण्यांवर हल्ला केला तर इस्लामाबादकडून संयमाची आपेक्षा कोणी ठेवू नये.' भारतीय वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ गुरुवारी म्हणाले होते की एअरफोर्स सर्जिकल स्ट्राइक करुन पाकचे अण्वस्त्र अड्डे नष्ट करण्यास सक्षम आहे.
याचे गंभीर परिणाम होतील...
- पाकिस्तानचे दैनिक द डॉनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आसिफ यांनी हे वक्तव्य वॉशिंग्टनमधून केले आहे.
- त्यात म्हटल्यानुसार, आसिफ यांनी भारतीय राज्यकर्त्यांना आपील केले आहे की त्यांनी अशा प्रकारच्या कारवाईचा विचार करु नये याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
- आसिफ तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार (एनएसए) एच.आर. मॅकमास्टर आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसर यांची भेट घेतली.
काय म्हणाले होते धनोआ
- सरकारने आदेश दिल्यास हवाई दल सर्जिकल स्ट्राइकसह दोन आघाड्यांवर एकाचवेळी मोहिमा फत्ते करू शकते. आम्ही पाकिस्तानचे अण्वस्त्र अड्डे शोधून नष्ट करण्यास तर सक्षम आहोतच, शिवाय चीनच्या आव्हानांचाही सामना करू शकतो, असा इशारा भारताचे वायुदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी गुरुवारी दिला होता.
- वायुसेना दिनाच्या पूर्वसंध्येला एका पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल धनोआ बोलत होते.
- ते म्हणाले, भारतीय वायुदल युद्धाच्या दोन शक्यतांशी लढण्यास पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालीन स्थिती कमीत कमी वेळेत पूर्ण क्षमतेने युद्ध करण्यास आम्ही सक्षम आहोत. पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी ४२ फायटर स्क्वॉड्रनची गरज आहे असे नाही. इतकी ताकद नसतानाही आम्ही या दोन्ही शक्यतांशी लढा देऊ शकतो.
- २०३२ पर्यंत वायुदल ४२ फायटर स्क्वॉड्रनची स्वीकृत क्षमता प्राप्त करून घेईल. चुम्बी व्हॅलीमध्ये चीनची फौज तैनात असून हा डोकलामचाच भाग आहे. उन्हाळी शिबिरानंतर चिनी लष्कर तेथून परत जाईल, असेही त्यांनी सांगितले.
- वायुसेनाप्रमुखांना विमान अपघात तसेच त्यामुळे होणारी जीवित तसेच वित्तहानीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या विमानांची खरेदी तसेच प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिला वैमानिकांच्या नियुक्तीबाबत ते म्हणाले, भरती प्रक्रिया सुरू असून काही महिलांना तैनात करण्यात आले आहे. लष्करी शिबिरांची सुरक्षाही वाढवली जात आहे.